esakal | माध्यमातील 'स्त्री' प्रतिमा कशी ?; त्याचे उत्तर 'चित्रभाषेत' 

बोलून बातमी शोधा

world womens day special portrayal of women in media specially film and advertisement }

 चित्रपट माध्यमाचा अविष्कार शतकभरापुर्वीचा. या माध्यमातून स्त्री विषयक आशय निर्मितीची सुरवात केली तीच मुळात पुरुषांनी. 

माध्यमातील 'स्त्री' प्रतिमा कशी ?; त्याचे उत्तर 'चित्रभाषेत' 
sakal_logo
By
प्रा.संदीप गि-हे

माध्यम ही खूप व्यामिश्र स्वरुपाची संकल्पना आहे. माध्यमातील स्त्री किंवा माध्यमातील स्त्री प्रतिमा हा विषय समजून घेताना आपल्याला चित्रपट माध्यम म्हणून काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम आहे. यामध्ये चित्र व ध्वनी आधारित वर्णन केलेले असत. या दृकश्राव्य आशायाची अभिव्यक्ती, रंग, आकार, प्रकाशयोजना, प्रतीकात्मक वस्तू या सर्वांची एकत्रित रचना व इतर अनेक संदर्भाने अर्थ लावण्याची प्रक्रिया प्रेक्षकाला पार पाडावी लागते. चित्रपट निर्मितीसाठी गोष्टींचे वास्तव आणि जिवंत चित्रण करणे गरजेचे आहे. चित्रभाषा मधून स्त्री प्रतिमा निर्मितीसाठी रंग, वस्त्र, प्रत्यक्षात स्त्री शरिराचा वापर, शरीराचा आकार, शरीराची ठेवण ते चित्रित करण्यासाठी केलेली प्रकाशयोजना याचा एकत्रितपणे परीणाम साधला जातो.

चित्रभाषेमधून नोकरी करणारी व घरकाम करणारी, विवाहित व घटस्फोटीत किंवा पतिव्रता व व्याभिचारी अशा दोन्ही व्यक्तींची प्रतिमा निर्मिती एकाच स्त्री अभिनेत्रीचा, सारखीच शरीर रचना व वस्त्रांचा वापर करून दाखवता येते तेंव्हा आता प्रेक्षकांच्या या संकल्पनाच्या समज व अनुभवावर आणि चित्र भाषेच्या आकलनावर चित्रपटातील स्त्री विषयाच्या प्रतिमांचा अर्थ लावणे अवलंबून आहे. चित्रभाषा - दिसणारा आशय - प्रेक्षकाची दृष्टी याचा एकत्रितपणे परीणाम झाला की प्रतीमानिर्मितीचे वर्तुळ पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

    चित्रपट माध्यमाचा अविष्कार शतकभरापुर्वीचा. या माध्यमातून स्त्री विषयक आशय निर्मितीची सुरवात केली तीच मुळात पुरुषांनी. आजही हे माध्यम व्यावसाईक, आर्थिक आणि आशय निर्मितीच्या बाबतीत प्रामुख्याने पुरुष केंद्रीच आहेत. स्त्रियांचा वाटा यात फार कमी आहे. भारतात दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' ची निर्मिती सुरु केली तेंव्हा या कथेतील स्त्रि पात्राचा अभिनय करण्यासाठी एकही स्त्री तयार झाली नाही. मग दादासाहेबांनी पुरुषालाच 'स्री'  वेशभूषा करून ही स्त्रि पात्र साकारली. एखाद्या पुरुषाने स्त्रि वेशभूषा करून दृश्य स्वरुपात स्री पात्रं साकारणं आणि आपण ते प्रेक्षक म्हणून स्त्रि स्वरुपात स्विकारण यातून त्या आशयाच्या अर्थाचे वर्तुळ पूर्ण होणे शक्य आहे का? थोडस अवघड होतंय का? आपण थोड सोप करून बघू. 

एखाद्या पुरुषाने स्री वेशभूषा करून 'पुरुष विश्वात' आणि 'स्री विश्वात' सामावणं यात फरक नाही का? असं समजा की एक पुरुष स्त्रि वेशभूषा करून पुरुषांशी मैत्री, संभाषण किंवा शारीरिक लगट करतोय आणि एखाद्या स्त्रीशी मैत्री, संभाषण किंवा शारीरिक लगट करतोय. या उलट एक स्त्रि तिची वेशभूषा करून पुरुषांशी मैत्री, संभाषण किंवा शारीरिक लगट करतेय आणि एखाद्या स्त्रीशी मैत्री, संभाषण किंवा शारीरिक लगट करतेय या प्रक्रियांमध्ये काहीच फरक नाही का? असेल तर कोणता? त्याचा स्त्री आणि पुरुष यांच्या समजेवर स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे काय परीणाम होणे अपेक्षित आहे? या प्रश्नांच्या उत्तरातूनच आपल्याला या विषयाच्या मुळापर्यंत पोहचता येऊ शकेल. पण तरीही हा विषय पूर्णपणे समजून घेता येऊ शकणार नाही. याचे कारण म्हणजे आतापर्यंत माध्यमांमध्ये स्त्री प्रतिमांची केलेली निर्मिती ही प्रामुख्याने पुरुषी प्रभावाने केलेली आहे आणि ती आपण स्त्री संदर्भाने समजून घेण्याचा प्रयत्न करतोय हा विरोधाभास. म्हणजे हे लिहित असतानाही मी पुरुष आहे या परिघा पलीकडे मला जाता येणार नाही.

काही अपवाद सोडले तर स्त्रियांच्याही बाबतीत हीच परिस्थिती आहे की त्या माध्यमातल्या या स्त्री प्रतीमांकडे स्त्री म्हणून बघण्या ऐवजी पुरुषी नजरेनेच बघत आहेत, कारण सततच्या पुरुषकेंद्री माध्यम आशय निर्मितीने स्त्रीची स्व:तची अशी समजच तयार होऊ दिली नाही. माध्यमातील ही स्त्री विषयक आशय निर्मिती पर्यायाने प्रतिमानिर्मिती आपली हीच मानसिकता कायम ठेवण्यासाठीच होत असते. कारण यात खूप मोठ्या प्रमाणावर भौतिक बाजार व्यवस्थेचे अर्थकारण अवलंबून आहे. ते दुर्लक्षित करून आपण फक्त स्त्री प्रतीमांचाच अर्थ लावत बसतो, म्हणून मग त्यातून पूर्णपणे काही निष्पन्न होत नाही. बाजार संस्कृतीचा मुद्दा लक्षात घेतला की माध्यमातील स्त्री प्रतिमांचा अर्थ लावण्यची प्रक्रिया काहीशी पूर्णत्वाच्या दिशेने जाऊ लागते.

  भारतीय संदर्भात, एक शतकानंतर चित्रपट माध्यमाचा विचार केला तर जवळपास सात दशकापर्यंत हे माध्यम पूर्ण पणे पुरुषी प्रभावाखाली होते. तो पर्यंत निर्माण केलेल्या स्त्री प्रतिमा पुरुष प्रभावातून तयार झालेल्या दिसून येतात. अगदी अलीकडच्या दोन, तीन दशकापासून काही स्त्रियांनी दिग्दर्शक म्हणून या माध्यमातून आशय निर्मिती सुरु केली. त्याचेही दोन भाग करता येतील. यात स्त्री दिग्दर्शकांनी विविध विषयांसाठी केलेली आशय निर्मिती आणि 'स्त्री' म्हणून स्त्री विषयासाठी केलेली आशय व प्रतिमा निर्मिती. यातही दुसऱ्या संदर्भाची उदाहरणे खूप कमी आहेत. त्याचा शोध आता लीना यादव दिग्दर्शित 'पार्च्ड' चित्रपटापर्यंत येऊन थांबतो. हीच बाब पुरुषांच्या संदर्भाने लक्षात घेतली तर याच प्रमाणात हा शोध अरविंद रॉय चौधरी दिग्दर्शित 'पिंक' या चित्रपटापर्यंत येऊन थांबतो. त्याच्या प्रमाणाबद्दल मत मतांतर असू शकतात. परंतु तरीही हे प्रमाण ७०:३० या पलीकडे कधीही गेलेलं नाही (खर तर ९०:१०).

या दोन चित्रपटांमधील आशय आणि स्त्री प्रतिमा निर्मिती मधील फरक हाच मागील शंभर वर्षातील चित्रपटातील स्त्री प्रतीमांचा फरक आहे. मागील शंभरांहून अधिक वर्षापासून भारतात सतत चित्रपट निर्मितीची संख्या वाढत आहे. आता दरवर्षी भारतात किमान एक हजारपेक्षा जास्त चित्रपट तयार होतात. त्यात प्रामुख्याने पुरुषांनी तयार किंवा दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांची संख्या जास्त आहे. असे चित्रपट बहुसंखेने नायक प्रधानच आहेत, आणि व्यावसाईक उद्देशाने तयार केलेले आहेत. त्यातील आशय निर्मिर्ती ही दुय्यम बाब आहे. अशा चित्रपटांमध्ये नायिकेची म्हणजे स्त्री प्रतीमांची निर्मिती ही नायक प्रतिमांना, पर्यायाने नायकाच्या पुरुषपणाला सहाय्यक असते. या स्त्री प्रतिमांना स्वतंत्र स्त्री प्रतीमा म्हणून काहीही आशय व अर्थ असत नाही.


ह्या स्त्री प्रतिमा मुखत्वे प्रेयसी, पत्नी, मैत्रीण, बहीण, वेश्या अशा काहीही असल्या तरी त्यांचे अस्तित्व चित्रण कॅमेऱ्यासाठी तयार केलेल्या टंच तारुण्यातल्या स्त्रिया असच असत. आता ही स्त्रीची प्रत्यक्ष दिनक्रमातील किंवा दैनंदिन वास्तवातील प्रतीम आहे का? अशा चित्रपटातील प्रतिमा स्त्रीच्या शरीराकृतीच्या रेषांतून तिचे देहपण ठसवत असतात. चित्रपट भाषेचे हे एक व्यावसाईक वैशिष्ट आहे. त्यातली मेख आपल्याला ओळखता आली पाहिजे. चित्रपटातील गोष्ट असते पुरुषाची, असहाय तरुणाची, कधी गरीब तर कधी श्रीमंत मुलाची, कधी चोराची, नोकरी करणाऱ्याची, बेकाराची, समाजसेवकाची, व्यावसाईकाची तर कधी कधी स्वतःला शोधणाऱ्या तरुणाचीही. पण या गोष्टीतल्या स्त्री प्रतिमा असतात टंच शरीराच्या, उभारी आलेल्या छातीच्या, कमनीय बांध्याच्या, चेहऱ्यावर सुंदरतेचा पोत चढवलेल्या, तोडक्या कपड्यातल्या, अंग प्रदर्शन करणाऱ्या, हॉटेलातील 'डिश' मध्ये ठेवलेल्या 'चिकन लॉलीपॉप' सारख्या 'लेगपीस'चे लचके तोडून खाव्याश्या वाटणाऱ्या... यातून प्रेयसी, पत्नी, मैत्रीण, बहीण, आई, मुलगी, श्रमिका, अप्सरा, देवता, वेश्या आणि ईतर कोणतीही प्रतिमा सुटत नाही. पण कुणालाच कळत नाही हे चक्र थांबत कस नाही...?

नेमकी कशी होते ही प्रतिमा निर्मिती? याचे उत्तर चित्रभाषेत आहे. म्हणून आपण आधी माध्यमाची प्रस्तावना लक्षात घेतली. चित्रपटासाठी स्त्री प्रतिमांचे चित्र भाषेमध्ये चित्रीकरण करत असताना स्त्रियांवर कॅमेरा लावताना त्यांच्या शरीराकृतीच्या रेषांतून त्यांचे देहपण ठसवण्यासाठी, शरीराच्या बाह्य रेषा मिळतील असा लावला जातो. आता स्त्री कलाकाराला लावलेल्या कॅमेऱ्यासाठी 'अभिनय' करायला लावलं जात, खुणावलं जात. अपेक्षित प्रतिमा मिळण्यासाठी विशिष्ट कोनातून कॅमेऱ्याचे 'प्लेसिंग' केले जाते. त्यासाठी ठराविकच अंतर ठेवलं जात. स्त्री कलाकाराच्या शरीरावर विशिष्ट पद्धतीची प्रकाशयोजना केली जाते. स्त्रीच्या शारीराची जाणीव अधिक ठसठशीत केली जाते. बाईच्या शरीरावर कुठे प्रेक्षकाची नजर ठेवायची याची आखणी केलेली असते. आणि त्याच पद्धतीने प्रेक्षकांनी ती स्त्री प्रतीमा बघावी यासाठी त्याची आधी तशी दृष्टी, नजर विकसित केली जाते.

एकदा हा साच्या तयार झाला कि त्यात मसाला भरत रहायच आणि कोटी च्या कोटी उड्डाणे घेत रहायची. माध्यमातील स्त्री प्रतिमा पाहण्यासाठी ही 'दृष्टी' आपणच माध्यमाकडूनच विकत घेतो हे आपल्याला मान्य आहे का? कॅमेऱ्याणे दिलेली ही नजर आपण प्रेक्षक म्हणून स्वीकारतो. आजघडीला चित्रपटातील 'आईटम सॉंग' मधील चित्र आणि शाब्दिक स्त्री प्रतिमा 'पोर्न' च्या ही पलीकडे गेल्यात याची आपल्याला जाणीव आहे का? भारतातील किती स्त्रियांना ह्या स्त्री प्रतिमा हा खोटारडेपणा वाटतो. त्यांच्या स्त्री पणाचा अपमान वाटतो? काही वाटत असेल तर त्या काही बोलत-लिहत का नाही? का ह्या सर्व स्त्री प्रतिमा पुरुषांनी निर्माण केल्या म्हणून त्यांनीच त्याविरोधात बोलाव अशी त्यांची अपेक्षा आहे? मुळात पहिला प्रश्न हाच महत्वाचा प्रश्न आहे, की त्यांना याची जाणीव आहे का? चित्रपट माध्यमातून पुरुषांची जशी नजर विकसित केली गेली तेच स्त्रियांच्या बाबतीतही लागू होत. चित्रपटातील स्त्री प्रतिमांमध्ये जश्या स्त्रिया आहेत तशाच आपण प्रत्यक्षात असणं त्यांना अपेक्षित आहे अशा धारणेला वाव आहे.

कारण स्त्री ही या प्रतिमांच्या प्रभावातून स्वतःकडे स्त्री म्हणून न पाहता पुरुषाला ती जशी अपेक्षित आहे तशी स्वतः प्रत्यक्षातली स्त्री सकारात असते. आणि अनावधानाने 'सजना है मुझे सजना के लिये' या सुरात स्वतःला ढाळून घेते. असं होतच नाही असे किती स्त्रिया ठाम पणे सांगू शकतात. त्यांच्या शरीर सुंदरतेच्या सर्व संकल्पना बाजार संस्कृतीसाठी माध्यमांनी तयार केलेल्या आहेत. याची जाणीव त्यांना आहे का? किती स्त्रियांना आणि कोणती, स्त्री म्हणून स्वतःची भावना तयार करता आली? ज्यात माध्यमातील स्त्री प्रतिमांचा प्रभाव आहे का नाही, असेल तर किती हे स्पष्टपणे सांगता किंवा ओळखता येऊ शकते ?

आता या विषयाची अपवादात्मक बाजू म्हणजे 'पार्च्ड' आणि 'पिंक' व्हाया 'क़्वीन'. तरीही या चित्रपटाना थोड्याफार प्रमाणात आधीचीच पार्श्वभूमी आहे. 'पिंक' मध्ये पुरुष पात्रांची स्त्रीयांप्रती जी मानसिकता अधोरेखित करण्यात आली आहे त्यात याआधीच्या शतकभरातील काळात माध्यमांनी रुजवलेल्या स्त्री प्रतिमांचा वाटा किती? तीनही मुली एका टप्प्यावर आमचे चुकले या भावने पर्यंत का येतात? त्यांना स्त्री म्हणून तसे वाटते आहे का? का पुरुषी संकल्पानातील स्त्री प्रतिमांच्या प्रभावातून त्या अपराधी भावनेने ग्रासलेल्या आहेत? आणि त्यांचा कोर्टातील 'तारणहार'

पुरुषच असावा ही प्रतिमा निर्मिती आपल्याला मान्य आहे का? आता त्याच कोर्टातील नाट्यात न्यायाधीश एक स्त्री आणि तीन मुलींची बाजू मांडणारी पण एक स्त्री अशी प्रतिमा निर्मितीची कल्पना करून पहा. आताही तुमच्या मनात कोर्टातील तेच नाट्य घडत आहे का जे 'पिंक' मध्ये पडद्यावर घडत होते? जर काही फरक पडणार असेल तर हा विषय समजून घेण्याला अर्थ आहे. नाहीतर सगळ व्यर्थ. 

( लेखक हे चित्रपट विषयाचे अभ्यासक असून ते संज्ञापन अभ्यास विभाग, न्यु आर्टस, कॉर्मस, सायन्स कॉलेज अहमदनगर, विभागप्रमुख आहेत.)