
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी झिरो साइज फिगरची काही गरज नसते, हे ही अभिनेत्री सातत्याने पटवून देतेय.
मालिका किंवा चित्रपटांत काम करायचं म्हटलं तर अभिनेत्री ही सुंदर आणि सुडौल बांध्याचीच असली पाहिजे, या विचाराला आता अनेक मालिकांनी छेद दिला आहे. अगदी गुबगुबीत दिसणारी मुलगीसुद्धा मुख्य नायिकेची भूमिका साकारू शकते, हे हल्लीच्या मालिका किंवा चित्रपट पाहिले तर सहज स्पष्ट होतं. आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर या अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी झिरो साइज फिगरची काही गरज नसते हे ते सातत्याने पटवून देत असतात. अशाच एका अभिनेत्री सोशल मीडियावर नुकताच तिच्या बालपणीचा एक क्युट फोटो पोस्ट केला आहे. फोटोत दिसणारी ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या लोकप्रिय मालिकेतील स्वीटू अर्थात अभिनेत्री अन्विता फलटणकर आहे.
'जग काय म्हणेल याचा कधीच विचार न करणारी आणि हाक्का न्यूडल्सवर जीवापाड प्रेम करणारी ही चिमुकली', असं कॅप्शन देत अन्विताने तिच्या लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत दिसणाऱ्या चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत. सध्या 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेमुळे अन्विताची लोकप्रियता प्रचंड वाढली असून सोशल मीडियावरही तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढत आहे. मालिकेतील स्वीटू आणि ओमकार यांच्यातील केमिस्ट्रीसुद्धा चाहत्यांना खूप आवडतेय.
हेही वाचा : बर्फात सोनाली खरेचं शीर्षासन; पतीची कमेंट वाचून हसू होईल अनावर!
अन्विताने याआधी काही मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. 'टाइमपास' या चित्रपटात तिने केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. तर २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गर्ल्स' या चित्रपटात अन्विताने रुमीची भूमिका साकारली होती. तिने नाटकांतही काम केलंय. अभिनयासोबत अन्विताला नृत्याची फार आवड आहे. सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात.