अभिनयाची "उत्तुंग' जुगलबंदी - झीरो 

Zero
Zero

शाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या अभिनयाची उत्तुंग जुगलबंदी असलेला "झीरो' सिनेमा सरत्या वर्षात सिनेरसिकांच्या आठवणीत राहणारा आहे. बऊआ, आफिया आणि बबिता या तीन व्यक्तिरेखांभोवती हा सिनेमा गुंफला आहे. तिघांच्याही जगण्यातील जाणिवा, उणिवा आणि बलस्थानांवर भाष्य करत हा चित्रपट उत्सुकता, ताणतणाव, प्रेम, विरह अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर रसिकांना गुंतवून ठेवतो. 

उत्तर प्रदेशातील मेरठचा बऊआ सिंह (शाहरूख खान) हा "झीरो'चा नायक आहे. बऊआ बुटका असल्याने त्याच्या मनात सल आहे; पण स्वप्न मात्र उंच आहेत. सधन कुटुंबात वाढत असला तरी त्याला मित्रांसोबत मौजमजा, सिनेमा बघण्याचे वेड आहे. घरात श्रीमंती. त्या भरोशावर पैसे उडवण्यात कुठलीही कसर न सोडणारा. अशा या बऊआने वयाची तिशी पार केलीय. लग्न? बुटक्‍याशी कोण करणार? हा प्रश्न त्याच्यासह कुटुंबीयांनाही सतावणारा आहे. बबिता कुमारी (कतरिना कैफ) त्याची आवडती चित्रपट अभिनेत्री. तिच्यासाठी काहीही करण्यास तयार असणाऱ्या या "बऊआ'चे सूत मात्र आफिया (अनुष्का शर्मा) नावाच्या वैज्ञानिकेसोबत जुळते. दिव्यांग आजाराने पीडित असलेली आफिया व्हीलचेअरवरच असते. त्यांच्यात प्रेम होते. या प्रेमात त्याची आवडती अभिनेत्री बबिता येते आणि पुढे काय होते, याची उत्कसुता लावत या चित्रपटाची गोष्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवते. 

चित्रपटाच्या गोष्टीत अनेक चढउतार आहेत. धक्के आहेत. अपंगत्वाची सल आहे. सिनेसृष्टीतल्या सेलिब्रिटींचा झगमगाटही आहे. सोबतच या झगमगाटामागे प्रेक्षकांना न दिसणारा अंधारही बारकाईने टिपण्याचा प्रयत्न अधोरेखित झाला आहे. सामान्य रसिकांना सिनेमात चकाकणाऱ्या तारकांची ओढ कायमच असते. तशी बऊआलाही आहे. त्या अर्थाने ही व्यक्तिरेखा सर्वसामान्य रसिकांचे प्रतिनिधित्व करणारी आहे. त्याने त्यातली सेलिब्रिटींच्या आयुष्यातली दुसरी बाजू बबिताच्या निमित्ताने दाखवून दिली आहे. 

माणसाला व्यंग असेल, अपंग असेल तर ते जगाला दिसते. त्याहीपेक्षा साजरीगोजरी दिसणारी काही माणसे मनातून किती अपंग असतात, याचीही जाणीव यानिमित्ताने करून देण्याचा या चित्रपटाचा हेतू असावा, हे सांगितलं पाहिजे. सिनेमाचे दिग्दर्शक आहेत आनंद एल. राय. मानवी मनातील वेगवेगळी आंदोलने टिपण्यात ते यशस्वी झाले आहेत. वेगवेगळे स्थळ-काळ दाखवताना, शाहरूख खानला बुटका दाखवण्यात त्यांनी बरीच लढाई जिंकली आहे. काही ठिकाणी अविश्वसनीय प्रसंगांनी गोष्ट वास्तवाशी झगडताना भासते. भास आणि आभास यातले मध्य गाठता आले नसते का, असा प्रश्न काही ठिकाणी अस्वस्थ करणारा आहे. पण तो चित्रपट आहे, हे मान्य करून सिनेमापुरते मान्य करायला हरकत नाही. 

या चित्रपटात बऊआ, आफिया आणि बबिता कुमारी या व्यक्तिरेखांसह इतर कलावंतांनी त्यांच्या त्यांच्या भूमिकांना यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. बऊआचा मित्र म्हणून मोहम्मद झिशान अय्युबने उत्तम साथ दिली आहे. याशिवाय सलमान खान, श्रीदेवी, जुही चावला असे अनेक पाहुणे कलाकारही क्षणभर झलक दाखवतात. चित्रपटाचे पार्श्‍वसंगीत आणि गाणी कथानुरूप आहेत, हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. गौरी खानची निर्मिती असलेला "झीरो' मनू आनंदच्या छायाचित्रलेखनाने सिद्ध झालाय. त्यांच्या कॅमेराने केलेल्या कमालीमुळे काही प्रसंग रोमांचक झाले आहेत. चित्रपटातील बॉलीवूडच्या तारकांसोबतच आकाशातल्या ताऱ्यांतही हा चित्रपट काही काळ रमवतो. नासाकडेही घेऊन जातो. प्रवास जरा लांबचा असला तरी मेरठच्या बऊआसोबत प्रेक्षकांनीही या चित्रपटाच्या निमित्ताने त्या नासाच्या अद्‌भुत जगात जरा वेळ डोकावायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com