
- आष्टी तालुक्यातील जनतेची पाण्याची समस्या लवकरच दूर करणार
- पुढील 25 वर्षे काँग्रेस - राष्ट्रवादी सत्तेवर येणार नाही
- समुद्रात वाहून जाणारे पाणी लवकरच मराठवाड्याला मिळणार
कडा (ता. आष्टी, जि. बीड) : मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. आष्टी तालुक्यातील जनतेची पाण्याची समस्या लवकरच दूर करणार आहे. कोकणाचे समुद्रात वाहून जाणारे पाणी लवकरच आष्टीसह मराठवाड्याला मिळणार असून अकरा धरणे एकमेकांना जोडले जाणार आहे. पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा सोमवारी (ता. २६) कडा येथे पोचली. भव्य स्वागत यात्रेचे सभेत रुपांतर झाले. त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मंत्री राम शिंदे, आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, माजी आमदार साहेबराव दरेकर रथात होते.
फडणवीस म्हणाले, विरोधकही यात्रा काढत आहेत. मात्र त्यांची परस्परांविरोधी हल्ले सुरु आहेत. त्यांच्या सत्तेची मुजोरी जनतेने पाहीली असल्यानेच त्यांना सत्तेवरुन खाली खेचत आमच्या हाती सुत्रे दिली. पुढील 25 वर्षे काँग्रेस - राष्ट्रवादी सत्तेवर येणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून अकरा धरणे ऐकमेकांना जोडून भविष्यातील मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा हटविला जाईल. यावेळी पंकजा मुंडे यांचेही भाषण झाले.