#MarathaKrantiMorcha 'गुन्हे मागे घ्या अन्यथा ठाण्यांसमोर ठिय्या आणि जेलभरो'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 July 2018

शासनाने आपले शिष्टमंडळ परळीत पाठवावे किंवा लाईव्ह चर्चा करून निर्णय घ्यावा. पण जो काही निर्णय या आंदोलनासंबंधात घेतला जाईल. तो फक्त परळीतच घेतला जाईल. तसेच, आरक्षण आंदोलनाबाबत दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाहीत तर ता.1  ऑगस्ट रोजी सर्वच पोलिस ठाण्यांसमोर ठिय्या आणि जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा शनिवारी (ता. 28) येथील आंदोलकांनी दिला.

परळी वैजनाथ : शासनाने आपले शिष्टमंडळ परळीत पाठवावे किंवा लाईव्ह चर्चा करून निर्णय घ्यावा. पण जो काही निर्णय या आंदोलनासंबंधात घेतला जाईल. तो फक्त परळीतच घेतला जाईल. तसेच, आरक्षण आंदोलनाबाबत दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाहीत तर ता.1  ऑगस्ट रोजी सर्वच पोलिस ठाण्यांसमोर ठिय्या आणि जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा शनिवारी (ता. 28) येथील आंदोलकांनी दिला.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत मेगा भरती रद्द करावी या मागणीसाठी ता. 18 रोजी परळीत पहिला मराठा क्रांती ठोक मोर्चा निघून ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. शनिवारी (ता. 28) अकराव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरुच आहे.

आंदोलन लोकशाही मार्गाने सुरु आहे. आंदोलने करताना पोलिस परवानग्या घेतल्या जात आहेत. या आंदोलनाचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रात पोहचला असून मुंबई, पनवेल, पुणे, नाशिक, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नगर, बीडसह राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजाची शांततेत होत आहेत. मात्र, आंदोलनांच्या माध्यमातून बदनामी केली जात आहे.

आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शनिवारी आंदोलकांनी पत्रकार परिषदेत केला. हिंसक घटनांचे समर्थन करत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. मराठा समाज शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना या आंदोलनामध्ये दगडफेक व जाळपोळ करणारे कोण आहेत याचा शोध पोलिसांनी लावावा व आमच्या मराठा समन्वयक व मराठा तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करु नयेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha protesters stament in parali beed