#SakalForMaharashtra 'एकत्र येऊया...' वर तज्ज्ञांच्या भूमिका

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 July 2018

महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?  
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः  webeditor@esakal.com  
Call Center : 9225800800

पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. केवळ मराठाच नव्हे तर अन्य समाजही विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खरेतर सगळ्याच समाजाचे प्रश्‍न पोटापाण्याशी संबंधित आहेत. 'सकाळ'च्या आवाहनाची दखल घेऊन काही मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया.

तज्ज्ञांशी संवाद साधू शकतो
जाती धर्माचं राजकारण करत बसण्यापेक्षा आपण आपलीच मदत कशी करू शकतो हे आपण पाहिले पाहिजे. सध्या टेक्नॉलॉजीमुळे सगळे सहज शक्य झाले आहे असे मला वाटते. सध्या व्हॉटसअॅपच्या माध्यमातूनही आपल्याला काय करायचे आहे, त्यासंदर्भातील व्यक्तींशी, तज्ज्ञांशी संवाद साधू शकतो. असे अनेक ग्रुप्स केले जातात ज्यातून अनेक व्यायवसायिक एकत्र येऊन एकमेकांचा विकास घडवू शकतात. आपल्यातले गुण ओळखून प्रत्येकाने त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. 
- अजय नाईक, दिग्दर्शक

सामान्य नागरिक म्हणून आवाहन...
शेतमालाला भाव, दूधदर प्रश्न आरोग्य सेवा असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रात तोंड वासून उभे आहेत. प्रत्येक वेळी सरकारने आंदोलन चिंघळेपर्यंत बघ्याची भूमिका घेत आले आहे. आंदोलन घडू नये अशी कुठलीही भूमिका सरकारने गेल्या 4 वर्षात घेतली नाही. सकाळने अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे मी जनतेला एक सामान्य नागरिक म्हणून आवाहन करतो की, त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान द्यावेत.
- सुहास गाडेकर, फार्मा उद्योजक, मुंबई

केवळ कायदा माहिती असणे पुरेसे नाही​...
सामाजिक न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक वकिलांची गरज आहे. वकिली व्यवसायात स्थिरावण्यासाठी तसाही मोठा काळ लागतो. मानवी हक्क, पर्यावरण संरक्षण, वंचित समाज घटकांचे प्रश्न यावर प्रामाणिकपणे काम करीत वकिली करून व्यावसायिक यश आणि पैसा कमावत समाधानाचा आनंद सुद्धा मिळविता येतो. वकील म्हणजे सामाजिक भान असणारा असे वेगळे सांगावे लागावे असे टोकाचे व्यावसायिकरण झाले असताना वकिलीचा नवीन आयाम प्रस्थापित करीत 'रोजगाराच्या' अनेक प्रतिष्ठित संधी देण्यासाठी मी अनेकांना मार्गदर्शन करीत असतो. केवळ कायदा माहिती असणे पुरेसे नाही त्याचे व्यापक घटनात्मक अर्थ काढण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी वाचन करण्याची तयारी पाहिजे. केवळ प्रसिद्धी तात्पुरती असते, कामामुळे मिळणारी प्रसिद्धी म्हणजे जबाबदारी असते. मी सामाजिक न्याय क्षेत्रात काम करू इच्छितात अशा सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांना रोजगाराच्या अशा अनेक संधींबाबत सांगू शकतो आणि त्यांना खूप कमी कालावधीत आर्थिक यश मिळविण्यासाठी मदत करू शकतो.
- अॅड. असीम सरोदे

तरूणांना व्यवसायात उद्युक्त करणे गरजेचे
खरं तर तरुणांना व्यवसायात उतरविण्यासाठी उद्युक्त करणे आवश्यक आहे. मेहनत केली तर नक्की यश मिळते. सकाळने हाती घेतलेल्या उपक्रमात माझे देखील योगदान असेल. तरुणांना योग्य ती दिशा दाखविणे गरजेचे असून सकाळने हाती घेतलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायाबाबत मार्गदर्शन मिळू शकते. त्यामुळे युवा उद्योजकांनी एकत्र येत सकाळच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
- योगेश देशमुख, युवा उद्योजक, कल्याण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal for maharashtra experts reaction