#SakalForMaharashtra 'एकत्र येऊया...'मध्ये मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 July 2018

महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?  
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः  webeditor@esakal.com  
Call Center : 9225800800

पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. केवळ मराठाच नव्हे तर अन्य समाजही विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खरेतर सगळ्याच समाजाचे प्रश्‍न पोटापाण्याशी संबंधित आहेत. 'सकाळ'च्या आवाहनाची दखल घेऊन काही मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया.

सकाळच्या उपक्रमात आम्हीही खारीचा वाटा उचलू
मुरबाड तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना विनासायास शिक्षण मिळावे यासाठी अंबरनाथच्या स्पंदन संस्थेने पुढाकार घेतला आहे. तीन टप्प्यात वीस शाळांत हॅपी स्कुल बनवण्याचे संस्थेने ठरवले आहे. शाळांना सुविधा पुरवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना दप्तरे, स्टेशनरी, वह्या आणि चप्पल पुरवणे, दुसऱ्या टप्प्यात शाळेला संगणक आणि शुद्ध पाणी पुरवठा करणारे वॉटर फिल्टर देणे आणि तिसऱ्या टप्प्यात शाळेतील विद्यार्थीनींसाठी शाळेत स्वच्छतागृह उभारण्यावर भर असेल. स्पंदन आणि रोटरी क्लबच्या सहकार्याने प्रत्येक आदिवासी शाळा हॅपी स्कुल बनवणार आहे. सकाळच्या उपक्रमात आम्हीही खारीचा वाटा उचलू. 
- डॉ. राहुल चौधरी, अध्यक्ष स्पंदन फौंडेशन, अंबरनाथ

तरूणांना व्यावसायिक मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे
उद्योग व्यावसायात तरूणांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही. व्यवसाय निर्मीतीसाठी शासकिय पातळीवर असणाऱ्या कायद्यांबाबत मार्गदर्शन व सहकार्य व्हायला हवे. राज्यात अनेक तरूण व्यवसाय करू इच्छीतात पण त्यांना याबाबत पुरेपूर माहिती मिळत नाही. अपूऱ्या माहितीमुळे फसवणूक होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे उद्योग करू इच्छिणाऱ्या तरूणांना प्रशिक्षण मिळायला हवे. सकाळच्या या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा व मी माझे लहानसे योगदान द्यायला तयार आहे. 
- सुहास आदमाने, उद्योजक स्पेन्का ग्रुप

एकत्र येऊया.. ही भविष्यातील एक मोठी चळवळ 
देशात आजवर एकत्रिकरणातून घडलेल्या मोहिमा पुढे जाऊन चळवळी झाल्या आहेत. समाजात एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून एकत्र आल्यास अनेक अडलेल्यांचे प्रश्न सुटतील. राज्यभरातील पाणी प्रश्न काही संघटना एकत्र आल्यामुळेच सुटला. महिला बचत गट, सोसायट्या यांच्याप्रमाणे लघु उद्योग सुरू केल्यास समाजातील अनेक बेरोजगारांना नोकऱ्यांची संधी मिळेल. अशाच उपक्रमातून स्टार्टपला वाव मिळेल. सकाळने सुरू केलेल्या मोहिमेचा भाग व्हायला नक्की आवडेल. आमच्याकडे असलेले तंत्रज्ञान इतरांना दिल्यामुळे समाजाचे भले होणार असेल तर हा उपक्रम वाखाणण्यासारखा आहे. वारंवार सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण समाजासाठी काही तरी करतोय ही भावना यातून निर्माण होणार आहे.
- वर्षा भगत, संचालिका, नवी मुंबई महापालिका अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्र 

प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरे शोधायला हवीत...
एकत्र येऊया..हा सकाळने सुरू केलला उपक्रम खरंच स्तुत्य उपक्रम आहे. सध्या समाजातील एकोपा संपत चालला आहे. त्यामुळे एकमेकांमधील सुसंवाद कमी झाला आहे. याने समाजातील एकमेकांना रोज उद्भवणारे प्रश्न पुढे जाऊन जटील समस्या होत आहेत. त्यामुळे सकाळने सुरू केलल्या मोहिमेत सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. एकमेकांना प्रश्न विचारण्यापेक्षा त्यावर उत्तर शोधायला हवी पाहिजेत. यातून एकमेकांच्या समस्या सुटतील असे मला वाटते. सकाळच्या माध्यमातून मला महिलांसाठी शिक्षण व मुलांचे आरोग्य या विषयावर काम करायला आवडेल. सध्या मी काम करत असलेल्या संस्थेतून अनेक गरीब मुलांना मदत केली आहे. काही एनजीओ विविध प्रश्नांवर काम करत आहेत. मात्र ते वेगवेगळे काम करीत असल्यामुळे प्रश्न सुटण्यास वेळ लागतो. सकाळ सारख्या माध्यमाने सुरू केलेल्या मोहिमेत सर्व सहभागी झाले तर ती पुढे जाऊन एक चळवळ उभी होईल. कारण लोकांची समस्या मांडून त्यावर त्याचे उत्तर शोधणे हे एका प्रभावी माध्यमाशिवाय होणार नाही. हे सकाळ माध्यम समूह करू शकेल.
- वृषाली मगदूम, सामाजिक कार्यकर्त्या, नवी मुंबई
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal for maharashtra reaction from people