#SakalForMaharashtra एकत्र येऊया... उपक्रमावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 July 2018

महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?  
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः  webeditor@esakal.com  
Call Center : 9225800800

पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. केवळ मराठाच नव्हे तर अन्य समाजही विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खरेतर सगळ्याच समाजाचे प्रश्‍न पोटापाण्याशी संबंधित आहेत. 'सकाळ'च्या आवाहनाची दखल घेऊन काही मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया.

महाराष्ट्राचे आजचे वातावरण बघता शेतकरी खूप अस्वस्थ आहे. शेती योग्य पद्धतीने न केल्याने व शेतीमालची बाजारपेठ योग्य न मिळाल्याने या शेती व्यवसायावर अवलंबून असलेला मोठा वर्ग अस्वस्थ आहे. त्याच्या नाराजीचा फायदा घेऊन राजकारणी लोक वेगवेगळ्या कारणांनी त्याला भडकवत आहेत. वास्तविक जर शेती हा व्यवसाय फायद्याचा झाला तर खूप मोठी नाराजी दूर होऊ शकते. हे करण्यासाठी खेडोपाडी नेहमी खंडित असलेल्या  पायाभूत सुविधा उदा. रस्ते, वीज, पाणी व इंटरनेट व्यवस्थित झाल्या पाहिजेत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होणे खूप गरजेचे आहे. एकत्र येऊन मार्ग काढतानासुद्धा ग्रामीण भागातील शेतीची जाण असलेल्या नेतृत्वाचा नेहमीच अभाव जाणवतो. शासन, शहरवासीय व स्थिरस्थावर झालेला नोकर वर्ग यांनी जाणीवपूर्वक शेतीकडे केलेले दुर्लक्ष देशवासियांच्या आरोग्यास घातक ठरणार आहे. म्हणूनच शेवटी येवढच सांगता येईल की यातून मार्ग काढताना तो आरोग्यदाई शाश्वत असावा यावर भर दिला पाहिजे.
- कृषीभूषण अनिल नारायण पाटील., सांगे, तालुका वाडा, जिल्हा पालघर

'सकाळ'चा हा उपक्रम स्तुत्य आहे. कौशल्य विकास केल्यास रोजगार व व्यवसाय दोन्हीमध्ये उच्च पातळीवर पोहोचू शकतो. नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमनने बिजनेस सेल स्थापन केली. या सेलमार्फत देशभरात मासेमारीची अद्ययावत पद्धती रुजवण्यासाठी जगभरातील तज्ज्ञांना बोलावून त्यांच्या मार्फत मच्छीमारांना मार्गदर्शन दिले होते. असेच उपक्रम सकाळमार्फत करण्यात नक्की आवडेल. सकाळच्या या सामाजिक उपक्रमाला माझा पाठिंबा असून आम्ही पूर्ण सहकार्य देण्यास तयार आहोत. नागरीकांनीही उपक्रमासाठी पुढे येऊन समाज विकासासाठी आपले योगदान द्यावे.
- डॉ. गजेंद्र भानजी, नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेन, राष्ट्रीय अध्यक्ष

तरुणाईमध्ये प्रचंड क्षमता आहे, त्यामुळे ही शक्ती आपण शेतीच्या प्रगतीसाठी वापरायला हवी. कृषी क्षेत्राशी निगडित उद्योग, जोडधंधे, कृषी प्रक्रिया यासारख्या उद्योगांचे अद्यावत प्रशिक्षण दिल्यास एक मोठा कुशल मनुष्यबळाचा गट शेतीसाठी उपलब्ध होईल. विविध योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी झाल्यास अनेक घटकांना फायदा होईल. शासनाबरोबरच सजग नागरिक म्हणून प्रत्येकाने जबाबदारी नेटाने पार पाडायला हवी. 
- साहेबराव पी. शेळके, नोकरदार

राज्यातील अनेक भागात व्यवसायपुरक साधनसामग्री उपलब्ध नाही. उच्च दर्जाचे गुणवत्ता असलेले शिक्षणदेखील मिळत नाही. सध्या मिळत असलेल्या शिक्षणाव्दारे चांगली नोकरी मिळेना झाली आहे. या परिस्थितीमुळेच अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यावर मात करण्यासाठी आता सकाळने उचललेले पाऊल निश्‍चित बदल घडवून आणणारे आहे. आगामी काळात आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी कृषीपुरक उद्योग, त्यासाठी आवश्‍यक असलेले प्रशिक्षण युवावर्गाला द्यावे लागणार आहे. तरुणांसाठी संवादाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्यास मोठा बदल होईल. या मोहीमेत आमचा सहभाग असेल. 
- राजेंद्र कोंढारे, पुणे 

उत्पन्नाचे साधने, पारंपरिक व्यवसाये नष्ट होत आहेत. लोकसंख्या वाढत असताना हाताला काम मिळत नसल्यानेही अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. पारंपरिक शेतीमध्ये गुरफटलेल्या युवकांना आधुनिकतेची जोड देण्यासाठी प्रेरणा देणारे वर्ग घ्यायला हवेत. खात्रीशिर उत्पन्न मिळण्यास सुरवात झाल्यास बदल दिसून येईल. ग्रामीण भागात शेती व्यवसायासह तेथील अन्य वस्तुंचेही मार्केटींग करावे लागणार आहे. मार्गदर्शन करण्यास कर्तृत्ववान व्यक्‍तींनी पुढाकार घेतल्यास निश्‍चितच याचा फायदा होईल. सकाळने सुरु केलेल्या या मोहीमेत आम्हीही पुढाकार घेऊ. 
- विलास शिंदे, नाशिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal For Maharashtra reactions of people