
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. केवळ मराठाच नव्हे तर अन्य समाजही विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खरेतर सगळ्याच समाजाचे प्रश्न पोटापाण्याशी संबंधित आहेत. 'सकाळ'च्या आवाहनाची दखल घेऊन काही मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया.
शेतीत फारसा राम राहिलेला नाही. गारपीट, नापिकी, दुष्काळ, अशा प्रत्येक वेळी सरकारवर अवलंबून रहावे लागते. आता असे परावलंबी होऊन चालणार नाही. "सकाळ'ने यातून मार्ग काढण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आपले उत्पन्न वाढले पाहिजे. आपण स्पर्धेत सक्षमपणे उभे राहू शकलो पाहिजे. मात्र कुणाचा द्वेष करत बसण्यापेक्षा सर्वांना बरोबर घेउन, एकत्र येऊन आपला समाज पुढे नेला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण हवे, पण कुणाचे हिसकावून नाही. सर्वांनी मिळून स्वत:चा, समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी एकत्र येउन स्वत:ची व समाजाची गुणवत्ता वाढवण्याशिवाय आता पर्याय नाही.
- सुभाष जावळे पाटील, परभणी
मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. शेती हा खर्चिक आणि बेभरवशी उद्योग असल्यामुळे त्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. जागतिकीकरणानंतर भारतात शेती वाढवण्यासाठी प्रयत्न झालेच नाहीत. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे 82 टक्के आत्महत्या या शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत. अमेरिकेत शेतकरी वाचवण्यासाठी ब्ल्यू ब्लॉक, ऑरेंज ब्लॉक, यलो ब्लॉक अशी सबसिडी दिली जाते. अशा काही उपयायोजना "सकाळ'च्या पुढाकारातून येत असतील, तर त्याचे निश्चित स्वागत होईल.
- बाळासाहेब पवार, अहमदनगर
मागील अनेक वर्षापासून वंचित ठेवण्यात आलेला घटक आपापल्या परीने न्याय हक्कांसाठी भांडत आहे. बहुतांश आंदोलनांच्या पाठिशी वैचारिक अधिष्ठान देणारे व्यक्तीदेखील आहेत. मोर्चे काढूनही पदरात काहीही पडत नसल्याने युवावर्ग भ्रमनिरास झाला आहे. हातात काठी घेतल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत, हे लक्षात आल्यानेच तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात आंदोलनात उतरला आहे. सरकारचा नाकर्तेपणा, न्यायालयाची केलेली ढाल, अवाजवीपणे दाखविण्यात आलेले स्वप्न अशी अनेक कारणे उद्रेकास कारणीभूत ठरत आहेत. "सकाळ'ने बदल घडवून आणण्यासाठी सुरु केलेल्या मोहिमेत काम करण्यास आपण सदैव तयार आहोत.
- प्रा. सदाशिव कमळकर, जालना
सध्या समाजात जे काही सुरु आहे ते खूप चिंतनीय आहे. यातून मार्ग काढण्यासाठी "सकाळ'ने पुढाकार घेतला आहे. एकत्र येऊन खूप काही करता येऊ शकते. कृषी क्षेत्रात खूप मोठे काम करता येईल. अन्नप्रक्रिया, शेतीमालावर आधारीत उद्योग, शेतीमालांना चांगल्या बाजारपेठांपर्यंत पोचविण्यासाठी देशातील चांगल्या बाजारपेठांत गाळे उपलब्ध करुन देऊन तिथे शेतकऱ्यांचा माल पाठवता येईल. यासाठी काही तरुण मार्केटींग करतील, काहीजण तिथे माल पोचविण्याची व्यवस्था करतील तर काहीजण तिथे विक्री करुन शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला दिला जाईल. मात्र विकलेल्या मालाच्या पैशांची वसुलीसाठी तिथल्या बाजार समित्यांनी, शासनाने हमी घेतली पाहीजे. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठीचे तीन, सहा महिन्यांचे अल्प कालावधीचे स्किल ओरिएंटेड कोर्स, वर्कशॉप करता येतील, यासाठी प्रशिक्षण देण्याची जबाबदारी घेण्याची माझी तयारी आहे. महिलांना रोजगार मिळावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात गारमेंट केंद्र सुरु करुन तेथे महिलांमार्फत गणवेश शिवुन त्या त्या जिल्ह्यातील शाळांना घेण्यासाठी बंधनकारक करता येईल.
- बी. टी. बच्छाव, जळगाव
तरुणांच्या हाताला काम नाही, त्यामुळे दिवसेंदिवस अस्वस्थता पसरत आहे. रोजगाराचा भाग म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सरकारने हॉटेल्स उभारण्यास परवानगी देताना हॉटेलमध्ये आरोग्यास अपकारक असणारे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कोल्डड्रिंक्स, चॉकलेट्स वगैरे ठेवण्यापेक्षा नारळपाणी, लेमन टी, सरबते ठेवण्याचे बंधन घालावे. स्थानिकांनी बनवलेल्या या पदार्थांच्या विक्रीतून फायदा होण्याबरोबरच ग्राहकांनाही आरोग्याच्या दृष्टीने फायदा होईल. समाजाला सकारात्मक दिशा देणारे काम "सकाळ'ने सुरु केले आहे. या विधायक कामासाठी शुभेच्छा!
- माऊली पवार, सोलापूर