#SakalForMaharashtra 'एकत्र येऊया...' उपक्रमावर वाचकांच्या प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 July 2018

महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?  
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः  webeditor@esakal.com  
Call Center : 9225800800

पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्यामुळे महाराष्ट्राचे समाजमन अस्वस्थ आहे. केवळ मराठाच नव्हे तर अन्य समाजही विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खरेतर सगळ्याच समाजाचे प्रश्‍न पोटापाण्याशी संबंधित आहेत. 'सकाळ'च्या आवाहनाची दखल घेऊन काही मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया.

जगण्यातील अडचणींमुळे समाजमन दिवसेंदिवस अस्वस्थ होत आहे. पुरेशा पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट, महागड्या शिक्षणामुळे वंचित होत असलेले तरुण याचा विचार करता जिल्हानिहाय व्यवस्था करायला हवी. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सामावून घ्यायला हवे. योग्य वेळी, योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. त्यासाठी मी वैयक्तिक भाग घेऊन नवीन पिढीसाठी शैक्षणीक ज्ञानाचा खजिना देण्यासाठी पुढाकार घेऊ इच्छितो. 
- सतीश भोसले, ठाणे 

समाजातील तरुणांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी कृतिशील कार्यक्रमांची गरज आहे. ग्रामीण भागातील उपलब्ध साधने अतिशय कमी आहेत. त्यामुळे बाजारपेठेच्या गरजेनुसार शासनाच्या विविध योजनांचा पूर्ण लाभ घेत कौशल्य विकास कार्यक्रम आखला पाहिजे. "सॉफ्ट स्किल्स' विकसित केली पाहिजेत. शाळा, महाविद्यालयीन स्तरावर हे प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी "सकाळ'ने घेतलेला पुढाकार गरजेचा आणि स्तुत्य आहे. 
- सचिन सावंत देसाई, रत्नागिरी 

शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यानेच नोकऱ्यांसह अन्य प्रश्‍न निर्माण झाले आहेत. शिक्षण नसल्याने आत्मविश्‍वासाचा अभाव आहे. म्हणून नवनवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. याकडे समाजाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आतापर्यंत काही करता आले नाही. आता किमान पुढील पिढीसमोर जटील समस्या निर्माण होऊ नये, हे पाहणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण द्यावे लागणार आहे. सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी त्यापैकी किती जण पात्र आहेत, हा एक प्रश्‍नच आहे. आज नोकऱ्या आहेत. मात्र, त्यासाठी कौशल्य विकासावर आधारित शिक्षण घेतले नसल्याने नोकरी मिळत नाही. "सकाळ'ने बदल घडविण्यासाठी सुरु केलेला उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद असून त्यासाठी आमची सोबत असेल. 
- मानसिंह पवार, उद्योजक, औरंगाबाद 

बारावीनंतर कौशल्य विकासासंदर्भात आपल्याकडे शैक्षणीक अभ्यासक्रम असतात. मात्र, त्यानंतरच्या पुस्तकी ज्ञानावर नोकरी मिळेलच याची शाश्‍वती नाही. शिक्षणापेक्षाही युवकांजवळ असलेल्या तांत्रिक ज्ञानाचा विचार व्हायला पाहिजे. ज्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था निर्माण करुन स्वयंरोजगार निर्मितीला चालना देणे गरजेचे आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा पोट भरेल, अशा शिक्षणाची गरज आहे. "सकाळ'च्या या स्तुत्य उपक्रमास माझाही पाठिंबा आहे. 
- योगेश थोरात, धुळे 

ग्रामीण भागातील उपजीविका शेती व त्यावर आधारित व्यवसायावर अवलंबून आहे. कौशल्यावर आधारित उत्पादन तंत्राबरोबर काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व प्रक्रीया उद्योगाच्या व्यवस्थापनावर भर द्यायला हवा. पशुधनावर आधारित उपजिवीका व उद्योग व्यवस्थापनाचे स्किल डेव्हलपमेंट झाल्यास ग्रामीण शेतीला, पूरक व्यवसायाला चालना मिळेल. यासाठी "सकाळ'च्या या चळवळीत आमची संस्थाही निश्‍चितच योगदान देईल. 
- सुभाष तांबोळी, अफार्म, रत्नागिरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal For Maharashtra readers reactions