Ganesh Festival : शिवाजीनगर पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम; गणरायाला लेझीम व ढोल ताशात निरोप  

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 19 September 2018

शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याकडे बसविलेल्या गणरायाचे सातव्या दिवशी बुधवारी (ता. १९) मोठ्या थाटात ध्वनीवर्धक यंत्र न लावता पारंपारीक लेझीम व ढोलताशांच्या गजरात विसर्जन केले. ही बाब अन्य गणेशमंंडळांनी आदर्श घेण्यासारखी असल्याचे मत पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या हस्ते आरती घेण्यात आली.

नांदेड: गर्दीतील माणुस कुठलाही सण- उत्सव आनंदाच्या व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करतो तो केवळ बाजुलाच उभ्या असलेल्या वर्दीतील माणसामुळे. या वर्दीतील माणसालाही आपल्या भावना जपण्याचा अधिकार असतो परंतु तो कायद्याच्या चौकटीत अडकलेला असतो. मात्र शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याकडे बसविलेल्या गणरायाचे सातव्या दिवशी बुधवारी (ता. १९) मोठ्या थाटात ध्वनीवर्धक यंत्र न लावता पारंपारीक लेझीम व ढोलताशांच्या गजरात विसर्जन केले. ही बाब अन्य गणेशमंंडळांनी आदर्श घेण्यासारखी असल्याचे मत पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या हस्ते आरती घेण्यात आली.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली. नित्यनेमाने कर्मचाऱ्यांनी आपल्या गणरायाची आराधना केली. पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनीही त्यांना साथ दिली. बुधवारी (ता. १९) सातव्या दिवशीच गणरायाला निरोप देण्यात आला. कारण दहाव्या दिवशी अन्य गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर सज्ज रहावे लागते. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच तयारी केली. ठाण्याच्या प्रांगणात सुबक रांगोळी रेखाटली. सजावट करून पताका लावल्या. विशेष म्हणजे सर्व महिला अधिकारी व कर्मचारी या साडी व तुर्रेबाज फेटा बांधून सज्ज होत्या. तसेच अधिकारी व कर्मचारी पांढऱ्या शेरवानीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 

दुपारी पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के, धनंजय पाटील, निरीक्षक साहेबराव नरवाडे, संदीप शिवले, अनिरूध्द काकडे, विजय जोंधळे, एपीआय के. एस. पठाण, फौजदार कमल भोसले, श्रीदेवी पाटील, डी. एन. काळे, गोपीनाथ वाघमारे, श्री. कांबळे, नगरसेवक नागनाथ गड्डम, रमेश सोनाळे, पीन्टू पोकर्णा आणि पत्रकार यांची उपस्थिती होती. पोलिसांचा हा कार्यक्रम एखाद्या घरगुती कार्यक्रमासारखा झाला. शेवटी पोलिस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे यांनी सर्वांचे आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sendoff with plyaing dhol and lezim for ganapati in shivaji nagar pune