
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवाजीनगरच्या रेल्वेरुळावर आंदोलक बसल्याने पाच ते सहा तास वाहतूक खोळंबली होती. शहरातील चौका-चौकांत दिवसभर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन झाले. यात आंदोलकांनी रस्त्यावरच चहा, जेवण बनविले. मराठा क्रांती मोर्चाचा केंद्रबिंदू ठरलेल्या क्रांती चौकात हजारोंचा जमाव ठाण मांडून बसलेला होता. ‘जय जिजाऊ... जय शिवराय...’ यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवाजीनगरच्या रेल्वेरुळावर आंदोलक बसल्याने पाच ते सहा तास वाहतूक खोळंबली होती. शहरातील चौका-चौकांत दिवसभर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन झाले. यात आंदोलकांनी रस्त्यावरच चहा, जेवण बनविले. मराठा क्रांती मोर्चाचा केंद्रबिंदू ठरलेल्या क्रांती चौकात हजारोंचा जमाव ठाण मांडून बसलेला होता. ‘जय जिजाऊ... जय शिवराय...’ यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
क्रांती चौक दणाणला
मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी ज्या ठिकाणाहून पडली, तेथील वातावरण दिवसभर घोषणांनी दणाणले होते. मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरलेल्या चौकात प्रत्येकजण हजेरी लावत होता. लहान मुली, तरुणी, महिला शेकडोंच्या संख्येने क्रांती चौकात येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत होत्या. हातात झेंडे घेऊन तरुण सरकारविरोधी घोषणाबाजी करीत होते. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची वाहन रॅलीदेखील क्रांती चौकात धडकली. दिवसभर दुचाकींवरून, बुलेटवरून येणारे तरुण लक्षवेधी ठरत होते.
दानवे-आंदोलकांत धक्काबुक्की
क्रांती चौकातील आंदोलक सरकारविरोधी घोषणा देत होते. त्यादरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आले आणि त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. यात एकाला मारहाण झाल्याने आंदोलक आणि दानवे यांच्यात धक्काबुक्की झाली. नंतर दानवेंविरोधात घोषणाबाजी झाल्याने त्यांना ठिय्या आंदोलनस्थळावरूनही पोलिसांनी हलविले. ‘उद्धव ठाकरे जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याने पुन्हा दानवे समर्थक आणि आंदोलक समोरासमोर आले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत दानवे यांना क्रांती चौकातून निघून जाण्यास भाग पाडले. या प्रकारानंतर आंदोलक रात्री उशिरा क्रांती चौकापासून जवळच असलेल्या दानवे यांच्या कार्यालयासमोर जमले होते. नंतर पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले.
वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा औद्योगिक वसाहतींत बंद
कंपन्यांवर दगडफेक. सुमारे ३०० कोटींचे नुकसान
खंडपीठातील ६५० वकिलांचा महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग
शिवाजीनगर रेल्वेरुळावर आंदोलनकर्त्यांचा ठिय्या
एसटीच्या ११९९ फेऱ्या रद्द झाल्या, ८० लाखांचे नुकसान
चौकाचौकांत रास्ता रोको. व्याख्याने, भजन, कीर्तन
जमावाने २५ हून अधिक रुग्णवाहिकांची वाट केली सुकर
क्रांती चौकात द्रुत कृती दल, जलद कृती दल, दंगा नियंत्रण पथक, स्ट्रायकिंग पथक यांच्यासह वरुण, वज्र आदी अत्याधुनिक वाहने तैनात
छावणीचा बाजार भरलाच नाही. ठेकेदारांनी स्वत:हून लावले कुलूप
प्रोझोन, रिलायन्स, डीमार्ट मॉलसह ३५ पेट्रोलपंप दिवसभर बंद.
आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महापालिका, विद्यापीठात शुकशुकाट.
शिवाजीनगरात रुळावर ठिय्या
शिवाजीनगर परिसरातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी जोरदार ठिय्या आंदोलन केले. सचखंड एक्स्प्रेसला वाट करून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी यासाठी केलेली मध्यस्थीही निष्फळ ठरली.
आंदोलकांनी बीड बायपास, संग्रामनगर उड्डाणपूल, शहानूरमियाँ दर्गा येथे घोषणा देत सरकारचा निषेध केला. शिवाजीनगर भागातील रेल्वे ट्रॅकवर ठिय्या दिला. सकाळी साडेआठदरम्यान मालगाडी आणि हायकोर्ट एक्स्प्रेस रवाना झाल्यावर आंदोलकांनी या ट्रॅकवर बसून आंदोलन केले. यादरम्यान सचखंड एक्स्प्रेसला औरंगाबाद स्टेशनवर अडकून पडावे लागले होते. या गाडीला नांदेडकडील वाट मोकळी करून देण्यासाठी शिवाजीनगर येथील आंदोलन थांबवावे, अशी विनंती पोलिसांनी आंदोलकांना केली. आंदोलकांनी ट्रॅक रिकामा करण्यास नकार दिला. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहता पोलिसांनीही माघार घेतली. सायंकाळी चारच्या सुमारास आंदोलकांनी आपले आंदोलन थांबवले आणि त्यानंतर रेल्वेचा मार्ग मोकळा झाला.
बायपास ठप्प, संग्रामनगर पूलही बंद
सकाळी साडेनऊच्या सुमारास आंदोलकांनी बीड बायपासवर ठिय्या दिला आणि आंदोलनाला सुरवात केली. दुचाकी वाहने आडवी लावून रोखलेल्या बायपासवर गुरुवारी वाहनांची तुरळक गर्दी होती. संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या एका बाजूला आंदोलकांनी अडविल्याने सातारा आणि मुख्य शहराची जोडणी दिवसभर खोळंबली होती.
गृह विभागाने दिली होती माहिती
आंदोलनामुळे सहा सुपर एक्स्प्रेस खोळंबल्याची माहिती केंद्र सरकारकडून राज्यातील गृह विभागास देण्यात आली होती. तसेच ही कोंडी फोडण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. त्यानंतर दंगा नियंत्रण पथक, रेल्वे पोलिस, स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी येथे धाव घेत काही आंदोलकांच्या माध्यमातून ही कोंडी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.