दगडफेक, जाळपोळ, आत्महत्या करून आरक्षण मिळणार नाही; मराठा आरक्षण चिंतन परिषदेतील सूर

हरी तुगावकर
Friday, 3 August 2018

वैधानिक मार्गेनेच हे आरक्षण मिळवावे लागेल. याकरीता एकत्र येवून शासनावर दबाव आणावा लागेल, असा सूर येथे मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. 3) येथे आयोजित मराठा आरक्षण चिंतन परिषदेत निघाला.

लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 58 मोर्चे काढून इतिहास 
घडविला. पण सध्या सुरु असलेल्या आंदोलनात दगडफेक, जाळपोळ सुरु आहे. तरुण आत्महत्या करीत आहेत. याने मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. वैधानिक मार्गेनेच हे आरक्षण मिळवावे लागेल. याकरीता एकत्र येवून शासनावर दबाव आणावा लागेल, असा सूर येथे मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. 3) येथे आयोजित मराठा आरक्षण चिंतन परिषदेत निघाला.

विद्यार्थी बसून चिंतन करीत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आरक्षण कशासाठी पाहिजे याचे चिंतन झाले पाहिजे. 1967 पर्यंत या समाजाला आरक्षण होते. नंतर सरकारने काढून घेतले. आतापर्यंत मराठा समाजातील अनेक मुख्यमंत्री झाले तरी देखील उद्दीष्टापर्यंत पोहोचता आलेले नाही. आता समाज रस्त्यावर उतरला आहे. आरक्षणाची मागणी होताच आर्थिक निकषावर आरक्षणाचा मुद्दा पुढे आणला जात आहे. हा आरएसएसचा छुपा अजेंडा आहे. समान नागरी कायदा आणून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न होत आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. आज आंदोलनाला लागलेलं हिंसक स्वरुप विदारक आहे. हे थांबले पाहिजे. ही सरकार पुरस्कृत हिंसा आहे. मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे.

पाटीदार, गुर्जरांची हिंसक आंदोलने सरकारने चिरडून टाकली. तसे आपले आंदोलन होवू नये. अहिंसेच्या मार्गानेच लढा लढावा लागेल, असे मत सौरभ खेडेकर यांनी व्यक्त केले. तीन टक्के असलेल्या समाजाने कधी आंदोलने केले नाही, कधी मागणी केली नाही, कधी रस्त्यावर उतरला नाही तो समाज आज सत्तेवर आहे. मोहन भागवतांनी एक आदेश दिला तर सर्व कार्यकर्ते त्यांचा आदेश मानतात. पण तसे आपल्याकडे दिसत नाही. भावनेच्या भरात दगडफेक, जाळपोळ, आत्महत्या होत आहेत. हे थांबले पाहिजे. पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण कोणाचेच डोळे उघडले नाहीत. त्यामुळे हे प्रकार थांबले पाहिजेत. हिंसक आंदोलन एक तासात दडपली जावू शकतात, पण सरकार तसे करणार नाही. कारण याचा फायदा त्यांनाच
होणार आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. आपले आंदोलन चालूच राहिले पाहिजे. पण याकरीता हिंसा नको, केसेस नको, बळी जायलाही नको. वैधानिक मार्गानेच हे आंदोलन केले पाहिजे, असे अविनाश काकडे म्हणाले. या परिषदेत प्रा. संध्या कदम, नितीन सावंत, विशाल लोमटे आदी सहभागी झाले होते. या परिषदेकरीता समितीचे अविनाश पाटील, संभाजी काळे, नितीन जाधव, दिनेश शिंदे यांनी पुढाकार घेतला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Reservation Chintan Parishad Latur