लाॅकडाऊनचा फटका : मद्यनिर्मितीतून सरकारला मिळणारे ९६० कोटी बुडाले

प्रकाश बनकर
मंगळवार, 28 एप्रिल 2020

राज्य उत्पादन शुल्कच्या माध्यमातून औरंगाबादच्या नऊ मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून राज्य सरकारला दरवर्षी पाच हजार कोटींहून अधिक महसूल मिळतो. यावर्षी ५ हजार ५७५ कोटींचे लक्ष्य राज्य उत्पादन शुल्कला देण्यात आले होते.

औरंगाबाद : लॉकडाउनचा परिणाम वेगवेगळ्या उद्योगांबरोबर मद्यनिर्मितीवरही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यात मद्यनिर्मितीतून शासनाला मिळणाऱ्या महसुलातही मोठी तूट आली आहे. औरंगाबादेतील मद्य कंपन्या बंद असल्याने मार्च आणि एप्रिल महिन्याचा जवळपास ९६० कोटींचा महसूल कमी आला आहे. 

राज्य उत्पादन शुल्कच्या माध्यमातून औरंगाबादच्या नऊ मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून राज्य सरकारला दरवर्षी पाच हजार कोटींहून अधिक महसूल मिळतो. यावर्षी ५ हजार ५७५ कोटींचे लक्ष्य राज्य उत्पादन शुल्कला देण्यात आले होते. या उद्दिष्टपूर्तीला कोरोनाची आडकाठी आली आहे. यामुळे यंदा ४ हजार ६१५ कोटींचा महसूल विभागाला मिळाला आहे. यात ९६० कोटींची तूट आढळली आहे. ‘लॉकडाउन’मुळे हा परिणाम झाला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल. कदम यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

श्री. कदम म्हणाले, जवळपास दोन महिन्यात ८०० कोटींहून अधिक महसूल कमी आला आहे. मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन थांबवल्यामुळे हा परिणाम झाला आहे. एरवी एप्रिल महिन्यात जवळपास ४५० कोटींचा महसूल मिळतो, तर मार्च महिन्यात चारशे कोटींपर्यंतचा महसूल प्राप्त होत असतो.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मुंबई, पुण्यावर भिस्त 

औरंगाबाद येथील नऊ कंपन्यांमध्ये निर्मिती होणाऱ्या मद्याची सर्वाधिक विक्री ही मुंबई, पुणे, ठाणे या शहरांत होते. साधारणतः निर्मिती होणारे ७० टक्के प्रॉडक्शन या तिन्ही शहरांत जाते. तर तीस टक्के उर्वरित महाराष्ट्रात विक्री होते. सध्याच्या परिस्थितीत ही शहरे कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहेत. यामुळे लॉकडाउन संपल्यानंतरही अजून काही महिने या शहरात विक्री सुरू होणार नसल्याची चिन्हे आहेत. 
 

मद्यनिर्मिती करणाऱ्या नऊ कंपन्यांच्या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. यंदा साडेपाच हजार कोटींच्या महसुलाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते; मात्र त्यापैकी केवळ ४ हजार ६१५ कोटींचा महसूल मिळाला आहे. मार्च व एप्रिल महिन्यात ८०० ते हजार कोटींचा परिणाम लॉकडाउनमुळे झाला आहे. 
- एस. एल. कदम, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govenment Loss Nine Hundred 60 Crores Revenue Through Liquor Production