दिलासादायक : गृहमंत्री म्हणतात...प्रादुर्भाव कमी तिथे उद्योगांना सूट

प्रकाश बनकर
Sunday, 19 April 2020

शेतकऱ्यांच्या शेतमालास एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नियोजन करण्यासाठी कुठलीही अडचण नाही. शेतमालासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा खुल्या केल्या आहेत. 

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन पाळणे गरजेचे आहे. यासाठी लॉकडाउन आणखी कडक केले जाणार आहे; पण हे करताना जिथे प्रादुर्भाव कमी आहे त्या भागातील उद्योगांना सूट देता येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी (ता. १९) येथे पत्रकार परिषदेत दिली. 

विभागीय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेबाबत गृहमंत्री देशमुख यांनी आढावा घेतला. या बैठकीस राज्य फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, महापौर नंदकुमार घोडेले, खासदार इम्तियाज जलील, भाजप नेते डॉ. भागवत कराड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्‍थित होते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

गृहमंत्री देशमुख म्हणाले, ‘‘औरंगाबाद जिल्ह्यात टेस्टिंग झाल्या पाहिजेत, यासाठी टेस्टिंगची मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाच्या तेराशे टेस्टिंग झाल्या असून, महापालिका हद्दीत १लाख ९० हजार स्क्रीनिंग केल्या आहेत. २६ केअर सेंटरसाठी तेराशे बेड, तर डेडीकेटेड कोविड सेंटरसाठी २५०, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी ४५० बेडची व्यवस्था केली आहे.’’ 

जिल्ह्यात तबलिगी जमातच्या १०२ जणांना क्वारंटाइन केले आहे. आजपर्यंत राज्यात १५६ तबलिगी लोकांनी ट्रॅव्हल्स व्हिसाच्या नियमाचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. रमजान सुरू होणार असल्याने राज्य सरकारने दिलेले नियम व गाइडलाइन्सचे पालन करावे, असे फतवे अनेक जिल्ह्यातील मौलवींनी काढले आहेत. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अफवा; तसेच बातम्या सोशल मीडियावरून पसरविण्यात येत आहे. अशाप्रकारे अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शेतमालास राज्यातील सर्व सीमा खुल्या 
शेतकऱ्यांच्या शेतमालास एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नियोजन करण्यासाठी कुठलीही अडचण नाही. शेतमालासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा खुल्या केल्या आहेत. कोरोना प्रभाव असलेल्या भागात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे झोन बनविण्यात आले आहेत. या तीन झोनमध्ये उद्योगांना सूट देता येईल. यासह प्रभाव कमी असलेल्या भागात कारखानदारी सुरू करण्यासाठी राज्य सरकार मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. 

वर्तमानपत्रांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार 
वर्तमानपत्राच्या प्रिंटिंगसाठी सूट देण्यात आली आहे; मात्र वितरणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रश्नांवर देशमुख म्हणाले, ‘‘मी सध्या दौऱ्यावर आहे. याबाबतीत हाय पॉवर कमिटीने निर्णय घेतला आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.’’ 
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

गृहमंत्र्यांच्या बैठकीत मुद्दे 

  • गर्दी टाळणे, संचारबंदीचे पालन होणे सर्वाधिक गरजेचे 
  •  रमजानच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना फळे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियमानुसार गर्दी टाळून गल्लोगल्ली फळे खरेदीची सुविधा उपलब्ध करू द्या 
  • -गरजूंना रेशन दुकानांवर सुलभतेने सुरळीतरीत्या धान्य उपलब्ध होण्यासाठी आवश्यक उपाययोजना याव्यात. 
  •  रेशनकार्डधारक नसलेल्या लोकांना धान्य देण्यासाठी उद्योगसमूहांच्या सीएसआर निधीतून साह्य उपलब्ध करून देता येईल का, याची विचारणा करा 
  • ग्रामीण भागामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविकांची मदत घेत तपासणी करा. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where Infection Low There Concession For Industries, Said Anil Deshmukh