एकमताने घेऊ संभाजीनगरचा निर्णय, आदित्य ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट

माधव इतबारे
Sunday, 17 January 2021

प्रत्येक कामात विरोध करण्याची भाजपची भूमिका आहे. विरोध पक्ष म्हणून त्यांचे चांगले काम सुरू आहे, त्यांना शुभेच्छा! सरकारचा फोकस फक्त विकासकामांवर आहे, असा चिमटाही ठाकरे यांनी यावेळी काढला.

औरंगाबाद : कोरोनामुळे वर्षभरात विकासकामे होऊ शकली नव्हती. आता संसर्ग कमी होत असल्याने कामांची गती वाढली आहे. पाणी, कचरा व रस्त्यांच्या प्रश्‍न मार्गी लावून शहराचा चेहरा-मोहरा बदलू. संभाजीनगर संदर्भातील निर्णय आघाडी सरकार म्हणून एकमताने घेऊ, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (ता.१६) स्पष्ट केले. प्रत्येक कामात विरोध करण्याची भाजपची भूमिका आहे. विरोध पक्ष म्हणून त्यांचे चांगले काम सुरू आहे, त्यांना शुभेच्छा! सरकारचा फोकस फक्त विकासकामांवर आहे, असा चिमटाही ठाकरे यांनी यावेळी काढला.

शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण शनिवारी श्री. ठाकरे यांच्या हस्त करण्यात आले. यावेळी पत्रकारांसोबत ते बोलत होते. औरंगाबाद शहरातील रस्ते, पाणी व कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. निवडणुकीच्या तोंडावर नव्हे तर अनेक कामे गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. ती आता पूर्णत्वास येत आहेत. कोविडमुळे ठप्प पडलेल्या कामांना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे गती मिळत आहे. कामांची गती राज्यभर सुरू आहे, असा दावा ठाकरे यांनी केला. संभाजीनगरचा विषय आघाडी सरकार म्हणून एकमताने घेतला जाईल. आज भाजपचे लोक आम्हाला प्रश्‍न करत आहेत. त्यांची सत्ता असताना हा प्रश्‍न का मार्गी लागला नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

जगात कुठेही नाही,असा विरोधी पक्ष!
कोरोनाच्या महामारीतही भाजपने राजकारण केले. असा विरोधी पक्ष जगात कुठे नाही. विरोधी पक्ष म्हणून त्यांचे काम चांगले सुरू आहे. त्यांना शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांपेक्षा जास्त लोकप्रियता असल्याचे समोर आले आहे. याचे भाजपला दुःख असावे, असेही श्री. ठाकरे यांनी नमूद केले.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aaditya Thackeray Said, Unanimously Will Take Decision On Sambhajinagar Aurangabad News