esakal | कोरोनाची लस आली म्हणून नारळ फोडणे पटत नाही, माझ्यावर दाभोलकरांचे संस्कार झाले आहेत: सुप्रिया सुळे
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule

मी तुमचा पेपर चांगलाच लिहीन, मल्टिपल ऑप्शनवाला पेपर देणार नाही! बाकी सारे तपासणाऱ्यांच्या हातात आहे,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

कोरोनाची लस आली म्हणून नारळ फोडणे पटत नाही, माझ्यावर दाभोलकरांचे संस्कार झाले आहेत: सुप्रिया सुळे

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : ‘‘तुम्ही केलेली भाषणे पक्षांच्या नेत्यांना सांगायला पाहिजेत. यासाठी मी ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांना सांगेन आणि तिघांच्या स्वभावाप्रमाणेच तो पेपर लिहीन. मी तुमचा पेपर चांगलाच लिहीन, मल्टिपल ऑप्शनवाला पेपर देणार नाही! बाकी सारे तपासणाऱ्यांच्या हातात आहे,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. ‘‘मला किंवा सतीश चव्हाण यांना नामदार करा,’’ अशी मागणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केली होती, हाच धागा सुप्रिया सुळे यांनी पकडला.


आमदार सतीश चव्हाण यांनी सलग तीन वेळेस औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवल्याबद्दल शनिवारी (ता.१६) सुप्रिया सुळे यांच्याहस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सन्मानपत्र देण्यात आले. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते. व्यासपीठावर आशाताई चव्हाण, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, आमदार विक्रम काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार कैलास पाटील यांची उपस्थिती होती.


खासदार सुळे म्हणाल्या, की शिकलेले लोक आपल्याला निवडून देत नाहीत, हा आमचा समज होता, तो पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत खोटा ठरला. सर्व्हेमध्ये इथली एकमेव जागा महाविकास आघाडीला दाखवत होते. तरीही धाकधूक होतीच. मात्र, विक्रमी मतांनी इथल्या लोकांनी निवडून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. प्रतिष्ठा कर्तृत्वातून येते. त्याच्यामुळे तुमच्या स्टेक होल्डरसाठी तुम्ही संधी मागत आहात. त्यामुळे ही मागणी नक्की वरिष्ठांपर्यंत पोचवेन. कोरोनाची लस आली म्हणून नारळ फोडणे मला पटत नाही. माझ्यावर दाभोलकरांचे संस्कार झाले आहेत. माझा विज्ञानावर विश्‍वास आहे, असे रोखठोक मतही त्यांनी मांडले. सभागृहात एकआड एक खुर्ची रिकामी ठेवण्याचा नियम असताना तो अनेकांनी न पाळल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रस्तावना डॉ. राजेश करपे यांनी केली.


आम्हाला लाज वाटते!
कुलगुरुपदाच्या दीड वर्षाच्या काळात सतीश चव्हाण यांची कार्यतत्परता पाहिली असल्याचे डॉ. येवले यांनी सांगितले. चार पदव्या आणि दोन पीएच.डी. करून उमेदवार जेव्हा तासिका तत्त्वावर मुलाखती देण्यासाठी येतात, तेव्हा आम्हाला लाज वाटते, असे कुलगुरू म्हणाले. म्हणूनच रोजगार निर्मितीचे उपक्रम हाती घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

जात, पक्ष पाहिला नाही : चव्हाण
पवारसाहेबांकडे मागून काही मिळत नाही. न मागता ते खूप देतात. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जात आणि पक्ष पाहत नाहीत. त्यामुळेच पदवीधर निवडणुकीत देशभरातून विक्रमी मतांनी निवडून आलो. पवारसाहेबांचा विचार घेऊनच मी शिक्षण क्षेत्रातील चळवळीत सहभागी झालो. वैद्यकीय प्रवेशातील ७० : ३० फॉर्म्युलामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. दरवर्षीच्या ६०० विद्यार्थ्यांऐवजी यावर्षी १३०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. यापुढे मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. जे प्रश्‍न सोडवण्यासाठी पैसे लागत नाहीत, ते निर्णय लवकर घ्यावेत, हीच मागणी असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Edited - Ganesh Pitekar