
आमदार हरिभाऊ बागडे, कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे, राष्ट्रवादीचे अभिजित देशमुख यांनी गुरुवारी (ता.१८) ३६ अर्ज दाखल केले.
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. एकीकडे भाजपच्यावतीने कॉँग्रेस व शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे भाजप वगळून काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र करीत बँक ताब्यात घेण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार प्रयत्न करीत आहेत. यासाठी स्वत: एक तर मुलगा समीर सत्तार यांचे तीन अर्ज दाखल केले आहेत. राज्यमंत्री सत्तार पाठोपाठ आता या निवडणुकीत भाजपविरोधी मोट बांधण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी दिला आहे. यामुळे या निवडणुकीत भाजप एकटे पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीसाठी १५ फेब्रुवारीपासून अर्ज स्वीकारणे सुरु झाले. आतापर्यंत ४२ अर्ज दाखल झाले. पहिल्या दिवसापासून समीर सत्तार यांनी अर्ज दाखल करण्याचा सपाटा सुरु केला आहे. समीर सत्तार यांनी आतापर्यंत बिगर शेती संस्था मतदारसंघातून तीन अर्ज दाखल केले. यासह माजी आमदार नितीन पाटील यांनी मंगळवारी (ता.१६) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत अर्ज दाखल केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बँकेचे दिवंगत अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र करीत जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध केली होती. एवढेच नव्हे तर डबघईंला आलेली जिल्हा बँक नफ्यात आणली. तेव्हापासून सुरेश पाटील यांच्याकडे बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यांच्या मृत्यूनंतर सर्वपक्षीय संचालक मंडळांनी अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचा मुलगा माजी आमदार नितीन पाटील यांच्याकडे सोपवली होती.
वाचा - कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आमदार लग्नात डीजेवर नाचले, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
अब्दुल सत्तार आणि सुरेश पाटील यांचे चांगले संबंध होते. याचा फायदा उचलत आता राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नितीन पाटील यांच्या माध्यमातून बँक ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. एकीकडे आमदार हरिभाऊ बागडे सर्वांना एकत्र आणत बँकेवर पुन्हा भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली करीत आहे. त्यांच्या विरोधात राज्यमंत्री सत्तार आणि बागडेंचे प्रतिस्पर्धी डॉ. कल्याण काळेही भाजप विरोधात सूर काढत असल्याने भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
डॉ.काळेंची वेगळी खेळी
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न भाजपचे नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे करीत आहेत. बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हेदेखील याच मताचे आहेत. मात्र, बागडे यांनी बोलाविलेल्या बैठकांना डॉ. काळे गैरहजर राहिले होते. ‘जिल्हा बँकेची निवडणूक कधीच बिनविरोध झाली नाही. बिनविरोध निवडीचा फार्स करून सर्व पक्षांचे मोठे नेते एकत्र येऊन सामान्य नेत्यांना पराभूत करतात. आता ही पद्धत मोडीत काढायची आहे,' असे डॉ. काळे यांनी सांगितले. महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आहे. ही निवडणूक भाजपविरुद्ध लढाईची असल्याने जिल्हा बँकेत त्यांच्याबरोबर युती करून कसे चालेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने अशीच भूमिका घ्यावी, असे आवाहनही डॉ. काळे यांनी केले.
मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्हा बँका बंद पडल्या. औरंगाबाद जिल्हा बँकेबद्दल शेतकऱ्यांचे चांगले मत आहे. बँक कायम सुस्थितीत राहावी, यासाठी बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न होत आहेत. आम्ही डॉ. कल्याण काळे यांनाही सोबत येण्याची विनंती केली आहे.
- नितीन पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक.
जिल्हा बँक बातमी जोड
अर्जदार ------ अर्ज संख्या -------- मतदारसंघ
----------------
समीर सत्तार---३ --------बिगर शेती संस्था
अब्दुल सत्तार--२ ---कृषी पणन व शेतमाल प्रक्रीया
नितीन पाटील----- १------कृषी पणन व शेतमाल प्रक्रीया
हरिभाऊ बागडे---१------बिगर शेती संस्था
संदीपान भुमरे--------२-- प्रा.कृ.वि.का.से.सं.स.सं.ता.पैठण
अभिजित देशमुख ----२---कृषी पणन व शेतमाल प्रक्रिया संस्था
दमोदर नवपुते--------१-- बिगर शेती संस्था
नितीन पाटील--------२--- बिगर शेती संस्था
रामदास पालोदकर----१--- बिगर शेती संस्था
भुमरे, बागडेंचे अर्ज
आमदार हरिभाऊ बागडे, कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे, राष्ट्रवादीचे अभिजित देशमुख यांनी गुरुवारी (ता.१८) ३६ अर्ज दाखल केले. अर्ज दाखल केल्यामुळे आता बिनविरोध निवडणूक हा विषय संपुष्टात आला आहे. १५ फेब्रुवारीपासूत आजपर्यंत ३५ जणांनी ४२ दाखल केल्याची माहिती निवडणूक अधिकारी डॉ. मुकेश बारहाते
यांनी दिली.
Edited - Ganesh Pitekar