
औरंगाबाद महापालिकेवर अद्याप १८६ कोटी रुपयांचा विविध विकास कामांच्या बिलापोटीचा बोजा आहे.
औरंगाबाद : महापालिकेवर अद्याप १८६ कोटी रुपयांचा विविध विकास कामांच्या बिलापोटीचा बोजा आहे. गेल्या वर्षी तब्बल २८६ कोटी रुपयांची कंत्राटदारांची देणी होती. मात्र, प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गेल्या दीड वर्षात १०० कोटी रुपयांची बिले दिली असल्याचा दावा केला आहे.
शहरात महापालिकेतर्फे दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात. त्यात पाणी पुरवठा, ड्रेनेज, रस्त्यांसह इतर कामांचा समावेश आहे. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने कंत्राटदार काम करण्यास तयार नाहीत. पण अनेकवेळा नगरसेवक कंत्राटदाराला बिले काढून देण्याचे आश्वासन देत गळ घालतात.
त्यामुळे महापालिकेवरील देणी वाढत आहे. कंत्राटदार थकित बिलासाठी वारंवार आंदोलन करून थकले, पण अद्याप त्यांची बिले देण्यात आलेली नाहीत. दरम्यान एका कंत्राटदाराने ऑक्टोबर महिन्यात आत्महत्या केली. या प्रकारानंतर प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी कंत्राटदारांची ४० कोटीची बिले काढली. बिले वाटप करताना डीपी काँक्रीटीकरण, साइड ड्रेन, उद्यानांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे इतर कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या बिलासाठी खेट्या सुरूच आहेत. दरम्यान श्री. पांडेय यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षांत कंत्राटदारांना १०० कोटींची बिले वाटप केल्याचा दावा केला. असे असले तरी १८६ कोटींची बिले अद्याप थकीत आहेत.
ई-गव्हर्नर्समधून वाढणार उत्पन्न
स्मार्ट सिटी प्रकल्पातून महापालिकेने ई-गव्हर्नर्स प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडेल. शहरातील मालमत्ता रेकॉर्डवर येतील, वसुलीची कामे गतीने मार्गी लागतील, असे श्री. पांडेय यांनी सांगितले. उत्पन्न वाढल्यास फेब्रुवारी २०२१ मध्ये कंत्राटदारांची बिले काढले जातील, संपूर्ण रक्कम देण्यासाठी किमान दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो.
कोरोनामुळे दिलासा
कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून महापालिकेने आरोग्य विषयक कामे वगळता इतर कामांकडे लक्ष दिलेले नाही. नवी कामे झालेली नसल्याने नवी बिले देखील आलेली नाहीत. त्यामुळे थकबाकीच्या आकड्याला काहीसा ब्रेक लागला आहे.
Edited - Ganesh Pitekar