औरंगाबादेत भीषण अपघात : लग्नासाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा क्रूर घाला

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : बेफाम कारने चिकलठाणा येथील विमानतळाजवळ एका वाहनाला जोराची धडक दिल्यानंतर त्याच चालकाने कार आणखीनच सुसाट पळवित धूत रुग्णालयाजवळ उभ्या चार महिलांना धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन महिला जागीच ठार झाल्या.

या अपघातात आणखी दोन महिला गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (ता. सात) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास जालना रोडवरील म्हाडा कॉलनीजवळ घडली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, तुळसाबाई दामोदर गायकवाड (वय ७०) व आशामती विष्णू गायकवाड (वय ४०, दोघी रा. देवठाणा, ता. मंठा, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत. अहल्याबाई दादाराव गायकवाड (वय ७०) या गंभीर जखमी आहेत. अन्य जखमी महिलेचे नाव कळू शकले नाही.

देवठाणा येथील गंगाधर दादाराव गायकवाड यांच्या कुटुंबातील एक लग्न सोहळा जालना रोडवरील म्हाडा कॉलनी परिसरातील कांचन लॉन्समध्ये रविवारी आहे. त्यासाठी पाहुण्यांची औरंगाबादेतील म्हाडा कॉलनीतील गायकवाड यांच्या घरी येण्याची लगबग सुरू होती. मंठ्याहून काकू तुळसाबाई गायकवाड, आशामती विष्णू गायकवाड, अहल्याबाई गायकवाड आणि अजून एक महिला बसने दुपारी औरंगाबादेत आल्या.

जालना रोडवरील धूत हॉस्पिटलसमोर या तिघीही सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास बसमधून उतरल्या. त्या रस्त्याच्या डाव्या बाजूला स्थानिक नातेवाइकांची वाट पाहात असताना चिकलठाण्याहून सिडकोकडे भरधाव जाणाऱ्या कारचालकाने चौघींना उडवले. या भीषण अपघातात तुळसाबाई, आशामती व अहल्याबाई गंभीर जखमी झाल्या. यात तुळसाबाई आणि आशामती यांचा मृत्यू झाला. अहल्याबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याच अपघातात देवठाणा येथील आणखी एक साठ वर्षीय महिलाही जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच दिगंबर दामोदर गायकवाड व गंगाधर दादाराव गायकवाड यांच्यासह नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात घडल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार कारमध्ये आणखी एकजण होता. त्यानेही पलायन केले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अपघात प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com