आधी जुगारी पुढे, पोलिस मागे, नंतर पोलिस पुढे, शेतकरी मागे..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

आडूळजवळील थरार, एक पोलिस अधिकारी, पाच पोलिस जीव वाचविण्यासाठी लपले खोलीत 

आडूळ (जि. औरंगाबाद) - लहानपणापासून आपल्याला चोर, पोलिस हा खेळ आवडतो. चोरांच्या मागे धावणारे पोलिस हे दृष्य प्रत्येकाच्या हृदयावर ठसलेले आहे. आडूळ (ता. पैठण) शिवारात मात्र गुरूवारी (ता. १८) रात्री आठच्या सुमारास जरा उलटेच चित्र दिसले अन सारेच आचंबित झाले. आधी जुगारी पुढे अन पोलिस मागे पण नंतर पोलिस पुढे अन शेतकर्यांचा जमाव मागे असे थरारनाट्य पाहायला मिळाले. 

आडुळ शिवारात गेल्या अनेक दिवसांपासुन अवैधरित्या सुरु असलेल्या पत्याच्या अड्ड्याची माहिती पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भांबरे यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यावरून श्री, भांबरे हे पथकासह तेथे छापा टाकण्यासाठी गेले. जुगाऱ्यांनी आपली वाहने तेथेच टाकून पळ काढला. हे जुगारी रानावनात पळत असताना पोलिस त्यांचा पाठलाग करीत होते. जुगार अड्ड्या शेजारील रजापूर येथील शेतात पोलिसांनी दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आम्ही जुगार खेळणारे नसून बाजुचे शेतावाले आहोत असे सांगीतले. पोलिसांचा त्यांच्यावर संशय असल्याने त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी प्रतिकार करीत पोलिसांवरच हल्ला केला. 

 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ९७ टक्के एफआरपी रक्कम कारखान्यांनी केली अदा!

पोलिस साध्या वेषात असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा अंदाज आला नाही. तरीही आम्ही पोलिस आहोत, असे ते जोरजोराने ओरडून सांगत होतो, पण शेतकरी एकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मग काय आधी जुगाऱ्यांच्या मागे पोलिस हे चित्र बदलून पोलिसांच्या मागे शेतकरी असा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. शेतकऱ्यांची संख्या जास्त व पोलिस अवघे सहा जणांचे असल्याने शेवटी जुगाऱ्यांचा पिच्छा सोडून देत पोलिस स्वतःचा जीव वाचविणे बघू लागले. ज्या जुगार अड्ड्यावर त्यांनी छापा टाकला तेथील खोलीतच पोलिसांनी स्वतःला कोंडून घेतले. लगेच पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणुन एका खोलीतुन उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भांमरे व त्यांच्या सोबत असलेल्या इतर पाच पोलिस कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले.

अतिरिक्त पोलिस अधिक्षक गणेश गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाचोड पोलिसांनी घटनास्थळावरुन सोळा दुचाकी, एक कार, पत्याचे साहित्य जप्त केले. जमावापैकी हल्ला करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणुन चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक महेश आंधडे, दंगा काबु पथक यांना पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरु होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against gamblers at Aadul Tal. Paithan