दोघा भावांच्या मेहनतीला आले फळ, अतिपावसातही बहरली अद्रक शेती

प्रवीण अकोलकर
Thursday, 29 October 2020

गेल्या महिनाभरात कन्नड तालुक्यासह अनेक भागात तसेच हतनूर महसूल मंडळात सुरवातीपासून परतीच्या पावसाने थैमान घातले होते. अशा स्थितीतही हतनूर (ता.कन्नड) येथील तरुण शेतकऱ्यांनी अतिपावसातही अद्रकच्या शेतीसाठी योग्य व वेळेत नियोजन करून, अद्रक शेती जोमात बहरली आहे.

हतनूर (जि.औरंगाबाद) : गेल्या महिनाभरात कन्नड तालुक्यासह अनेक भागात तसेच हतनूर महसूल मंडळात सुरवातीपासून परतीच्या पावसाने थैमान घातले होते. अशा स्थितीतही हतनूर (ता.कन्नड) येथील तरुण शेतकऱ्यांनी अतिपावसातही अद्रकच्या शेतीसाठी योग्य व वेळेत नियोजन करून, अद्रक शेती जोमात बहरली आहे. यात उत्पादनही सरसरीपेक्षा जास्त निघण्याची शक्यता आहे.

कालमर्यादेत करा रस्त्यांची कामे पूर्ण, पालकमंत्री सुभाष देसाई यांचे आदेश

हतनूर येथील तरुण शेतकरी दिलीप केवट व देविदास केवट या भावंडांनी गट क्रमांक १६२ मधील शेतीत यंदा एक एकर अद्रक लागवड केली. यात नांगरणी पासून ते काढणीपर्यंत अद्रकचा एकरी खर्च सुमारे लाखापर्यंत येतो. यात उत्पादनही हमखास होते. परंतु यंदा तालुक्यातील अनेक भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीत पाणी साचून अनेक ठिकाणी अद्रकला सडरोगाने ग्रासले असून अद्रकचे प्लॉटच्या प्लॉट बसले. परंतु केवट बंधू तसेच हरी खंडागळे, संजय घुगे, या शेतकऱ्यांनीही वेळीच अद्रक शेतीसाठी चांगले नियोजन केल्याने पीक चांगले बहरले आहे. जोमात असलेल्या अद्रकचे एकरी १२० ते १५० क्विंटलपर्यंत उत्पादन निघण्याची शक्यता या शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

पावसातही अद्रक वाचवण्यासाठी अद्रकला वेळेत फवारणी, खतांचे डोस व अद्रकच्या शेतीत साचलेले बेडमधून पाणी काढण्याचे नियोजन केले. अद्रकचा एक एकर प्लॉट चांगला बहरल्याने, उत्पादनही चांगले निघण्याची आशा आहे.
- देविदास केवट, तरुण शेतकरी हतनूर

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adrak Farming Bloom Under Heavy Rain Aurangabad