कालमर्यादेत करा रस्त्यांची कामे पूर्ण, पालकमंत्री सुभाष देसाई यांचे आदेश

मधुकर कांबळे
Thursday, 29 October 2020

औरंगाबाद- वैजापूर, औरंगाबाद- सिल्लोड-अजिंठा या रस्त्यांसह जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करा. काम करताना कालमर्यादा पाळण्याचे आदेश राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले

औरंगाबाद : औरंगाबाद- वैजापूर, औरंगाबाद- सिल्लोड-अजिंठा या रस्त्यांसह जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करा. काम करताना कालमर्यादा पाळण्याचे आदेश राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी (ता.२९) पालकमंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग योजनांचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी आदेश दिले. बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी , नॅशनल हायवे ॲथॅारीटी ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चार व्यापाऱ्यांवर कारवाई, जीएसटी भरणा करण्यात अनियमितता आढळून आल्याचा संशय

श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्याअंतर्गत रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, शहरातील प्रमुख रस्ते यासह समृद्धी महामार्गाच्या कामांचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणांनी कामे कालमर्यादा पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. रस्ते दुरुस्तीच्या कामांमध्ये दर्जा आणि कालबध्दता पाळण्यास प्राधान्य द्यावे. तसेच वैजापूर -औरंगाबाद या रस्त्याची दुरुस्ती प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे ॲथॅारीटी ऑफ इंडिया या यंत्रणांनी तातडीने सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून दुरुस्ती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेऊन कालमर्यादेत सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना दिल्या. महापालिका आयुक्त श्री. पाण्डेय यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांसह इतर सर्व रस्ते दुरुस्तीची कामांच्या बाबत माहिती देऊन मुदतीत कामे पूर्ण केली जातील असे सांगितले. जिल्ह्यातून १२१ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यांपैकी ३७ किलोमीटरचे काम पूर्ण झाली आहे. करोडी औरंगाबाद आणि करोडी तेलवाडी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. तसेच वैजापूर रस्ते दुरुस्ती कामाची प्रक्रिया ही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे प्रकल्प संचालक श्री. गाडेकर यांनी यावेळी सांगितले.

भोळसर महिलेने बाळाला गटाराचे पाणी पाजले अन् कडेवरूनही फेकले! पोलिस धावले, जीव वाचला

पालकमंत्री करणार समृद्धी महामार्गाची पाहणी
जिल्ह्यातील नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग-दिवंगत बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. समृद्धी महामार्गामुळे कमी वेळात जास्त अंतर पार करणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने या महामार्गाचे काम गुणवत्तापूर्णरित्या ठरलेल्या कालावधीत करा. आवश्‍यक त्या ठिकाणी प्रवाशांसाठी सुविधा, नागरी सुविधा केंद्र उपलब्ध करून द्यावे, असे सूचीत केले. येत्या डिसेंबरमध्ये या कामाच्या प्रगती आणि गुणवत्तेची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ११२ किलोमीटर तर रुंदी १२० मीटर आहे. शेंद्रा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी इंटरचेंज टोल प्लाझा राहतील. जिथे नागरिकांना या महामार्गावर प्रवेश करता येईल व बाहेर येता येईल. हा महामार्ग सहा लेन मध्ये असून यावर वाहनांना १५० किलोमीटर वेग मर्यादा असणार आहे. महामार्गावर ५० किलोमीटरच्या अंतरावर नागरी सुविधा केंद्रेही राहणार आहेत. १ मे २०२१ रोजी नागपूर ते नाशिक महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजित असल्याचे एमएसआरडीसीचे श्री. साळुंखे यांनी सांगितले.  

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Within Time Limit Complete Roads Work, Guardian Minister Desai Order