esakal | तब्बल ३ वर्षानंतर आरोग्य विभागातील लिपीकाला अटक, बनावट स्वाक्षरीचा गैरफायदा
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News

बाबुराव नागोराव दांडगे (४८, रा. गुलमोहर कॉलनी, एन ५ सिडको) असे आरोपी लिपीकाचे नाव आहे.

तब्बल ३ वर्षानंतर आरोग्य विभागातील लिपीकाला अटक, बनावट स्वाक्षरीचा गैरफायदा

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : आरोग्य विभागाच्या कुष्ठरोग कार्यालयातील कर्मचाऱ्‍यांच्या कोषागारातून मंजूर झालेल्या देयकाची रक्कम कार्यालयीन खात्यावर जमा झाल्यानंतर परस्पर बनावट स्वाक्षरी करुन १५ लाख १२ हजार ६५६ रुपये लंपास करणाऱ्‍या वरिष्ठ लिपीकाला तब्बल तीन वर्षांनंतर बुधवारी (ता.३) पहाटे वेदांतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बाबुराव नागोराव दांडगे (४८, रा. गुलमोहर कॉलनी, एन ५ सिडको) असे आरोपी लिपीकाचे नाव आहे.


प्रकरणात कुष्ठरोग कार्यालय, औरंगाबाद येथील सहायक संचालक डॉ. विलास विखे पाटील यांच्या तक्रारीनुसार २ डिसेंबर २०१९ ला ते कार्यालयात असताना डी. एस. परभणे यांची लेखी तक्रार त्यांना प्राप्त झाली होती. या अनुषंगाने डॉ. विखे पाटील यांनी बील नोंदवहीची पाहणी केली असता परभणे यांनी अर्ज केलेला नसतानाही त्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जानेवारी २०१९ मध्ये ४७ हजार ४९२ रुपये व सप्टेंबर २०१९ मध्ये ८० हजार रुपये वरीष्ठ लिपिक दांडगे याने परस्पर आपल्या नावावर केल्याचे दिसून आले. त्यानंतर तीन डिसेंबर२०१९ ला व्हि.एम. गिरी यांनीही डॉ. विखे पाटील यांच्याकडे एक तक्रार दाखल केली. मार्च २०१९ पासून ऑक्टोबर २०१९ पर्यंतचे ९० हजार ४९६ रुपये वेतनातून कपात करुन दांडगे याने धुळे, नंदुरबार सहकारी बँक लिमिटेड धुळे यांच्याकडे वर्ग केले नाही.

यानंतर डॉ. विखे पाटील यांनी स्वत: व वैद्यकिय अधिकारी डॉ. जी.जी. कल्याणकर यांनी बिलांची लेखी तपासणी, कार्यालयीन बँक स्टेटमेंटची तपासणी केली. त्यावेळी दांडगे याने कार्यालयीन खात्यावरुन स्वत:च्या खात्यावर १५ लाख १२ हजार ६५६ रुपये वर्ग झालेले निर्दशनास आले. कार्यालयीन कामकाजासबंधी चेक बाऊंस चार्जेस सोळा हजार सातशे रुपये असे एकूण १५ लाख २९ हजार ३५६ रुपयांचा अपहार झाल्याचे निर्दशनास आले. प्रकरणात वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
संशयिताला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला शनिवारपर्यंत (ता.६) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी एम.एस. काकडे यांनी दिले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी आरोपीने परस्पर लंपास केलेली रक्‍कम हस्तगत करणे आहे. आरोपीच्या स्वाक्षरीचे नमुने घेणे बाकी असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

Edited - Ganesh Pitekar

go to top