तब्बल दोन महिन्यांनंतर गावगाडा सुरू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्याचा गावगाडा सुरू होत असल्याने ग्रामीण भागात आनंद व्यक्त होत आहे. सर्व बाजार, दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत सुरू राहतील. यासाठी मात्र काही अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे.

औरंगाबाद - शहर वगळता उर्वरित जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोनमध्‍ये झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शुक्रवारपासून (ता. २२) लॉकडाउन शिथिल करण्यात येत आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्याचा गावगाडा सुरू होत असल्याने ग्रामीण भागात आनंद व्यक्त होत आहे. सर्व बाजार, दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत सुरू राहतील. यासाठी मात्र काही अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे. 

हेही वाचा- वीजेची मागणी तीस टक्क्यांनी घटली

नियम पाळावेच लागतील
नवीन आदेशानुसार ऑनलाइन, दूरस्थ शिक्षणाला परवानगी राहील. बस डेपो, रेल्वेस्‍टेशन येथील उपाहारगृहे सुरू राहतील. घरपोच सेवा देण्‍यासाठी उपाहारगृहांना त्‍यांचे किचन सुरू ठेवता येईल. वैयक्तिक व्‍यायाम करण्‍यासाठी परवानगी असेल. मात्र, त्यासाठी सुरक्षित अंतर ठेवावे लागणार आहे. सामाजिक अंतर व निर्जंतुकीकरणाच्या उपायांचा अवलंब करून जिल्ह्याअंतर्गत बस वाहतूक जास्‍तीत जास्‍त ५० टक्‍के क्षमतेने करता येईल. सर्व शासकीय व खासगी वाहतुकीसाठी दुचाकीवर केवळ चालक, तीनचाकीसाठी चालक व इतर २ प्रवासी, तर चारचाकीसाठी चालक व इतर दोन प्रवासी असा नियम असेल. यामुळे तूर्तास ३१ मेपर्यंत ग्रामीण भागातील कारभार सुरू राहणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   

हे असेल बंद 
सर्व प्रकारचे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर सर्व आदरातिथ्‍य सेवा, सर्व सिनेमागृहे, मॉल्‍स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्‍यायामशाळा, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, प्रेक्षागृहे, बार, सभागृहे, मंगल कार्यालये आणि एकत्रित जमण्‍याची ठिकाणे. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडाविषयक, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इतर संमेलने. सर्व धार्मिक स्थळे, तसेच इतर सर्व प्रार्थनास्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद राहतील. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, यापूर्वी इतर आजार असलेल्‍या व्‍यक्‍ती, गरोदर महिला, १० वर्षांच्‍या खालील बालके, वैद्यकीय बाबी व अत्‍यावश्‍यक बाबी वगळता राष्‍ट्रीय निर्देशनानुसार घरी राहतील याची दक्षता घ्‍यावी. 

मद्यविक्रीस बंदीच 
शहरासह संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात मद्यविक्री बंदच राहणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात रेस्टॉरंटमध्ये मद्यसेवन करण्यास बंदी असेल. अत्‍यावश्‍यक गोष्‍टींची दुकाने, औषधालये व कृषिसेवा संबंधित दुकाने कोणत्‍याही परिस्थितीत सुरू राहतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After two months, the village administration started