सिडको वाळूज विरोधातील आंदोलन तूर्तास स्थगित, ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे निर्णय

रामराव भराड
Sunday, 20 December 2020

सिडको वाळूज महानगर येथील प्रकल्प रद्द न करता येथील समस्या मार्गी लावाव्या. या मागणीसाठी सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीच्या वतीने सिडको वाळूज विरोधातील आंदोलन आदर्श आचारसंहितेमुळे तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

वाळुज (जि.औरंगाबाद) : सिडको वाळूज महानगर येथील प्रकल्प रद्द न करता येथील समस्या मार्गी लावाव्या. या मागणीसाठी सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीच्या वतीने सिडको वाळूज विरोधातील आंदोलन आदर्श आचारसंहितेमुळे तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. सिडको वाळुज महानगर बचाव कृती समितीच्या वतीने सिडको प्रशासनाने सिडको वाळूज प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय ता.३ मार्च रोजी घेतला. तो रद्द करू नये. तसेच प्रकल्प सुरू करताना ज्या सुविधा आश्वासित केल्या.

 

 
 

त्या पूर्ण कराव्यात. त्याचप्रमाणे जोपर्यंत सक्षम स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत सिडको प्रशासनाने विकासकामे करावी. अशी मागणी मागील ३ महिन्यांपासून सिडको वाळूज महानगर बचाव कृती पाठपुरावा करत आहे. या अनुषंगाने २१ डिसेंबर रोजी अंदोलनात्मक भूमिका घेण्यासंदर्भात सिडको, जिल्हाधिकारी तसेच पोलिस प्रशासनास पत्र दिले होते. मात्र सध्या ग्रामपंचायत निवडणुका असल्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये. म्हणून आंदोलन करू नये, अशी लेखी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. म्हणून आचारसंहिता संपेपर्यंत आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

तसेच सिडको वाळुज महानगर बचाव कृती समितीच्या पदाधिकारी सोबत सिडको प्रशासन पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने सोमवारी (ता.२१)  सिडको कार्यालयात बैठक होणार आहे. त्यामुळे हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती सिडको वाळुज महानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी दिली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation Against Cidco Waluj Cancelled Aurangabad News