औरंगाबादेत खंडोबा यात्रेला सुरवात, भाविकांनी घेतले दर्शन

संदीप लांडगे
Sunday, 20 December 2020

औरंगाबाद येथील सातारा परिसरातील खंडोबा यात्रेला रविवारी (ता. २०) सुरुवात झाली.

औरंगाबाद : येथील सातारा परिसरातील खंडोबा यात्रेला रविवारी (ता. २०) सुरुवात झाली. सकाळी सव्वा सात वाजता महाआरती झाल्यानंतर खंडोबा मूर्तीची पालखी काढण्यात आली. त्यानंतर दिवसभर पालखी भाविकांच्या दर्शनासाठी दांडेकरांच्या वाड्यात ठेवण्यात आली होती. रविवारी कोरोनाच्या नियमांचे पालन करत भाविकांनी दर्शन घेतले. रविवारी चंपाषष्ठीला मार्तंड भैरवोत्थापन होत असल्याने यात्रेला सुरवात झाली. त्यानिमित्ताने खंडोबा मंदिरात पुजारी दिलीप धुमाळ, विजय धुमाळ, विशाल धुमाळ यांच्या हस्ते मध्यरात्री लघुरुद्र अभिषेक करण्यात आला.

 

 

त्यानंतर खंडोबा मूर्तीच्या महापूजेला करण्यात आली. सकाळी सहा वाजता खंडोबाला वांग्याचे भरीत-बाजरीचा रोडगा व पुरणपोळीसह १०१ पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आले. सकाळी सव्वासात वाजता १५ जणांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. सकाळी आठ वाजता मूर्तीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दिवसभर ही पालखी भाविकांच्या दर्शनासाठी दांडेकरांच्या वाड्यात विश्रांतीसाठी ठेवण्यात आली होती. रात्री आठ वाजता खंडोबाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून मंदिरात आणण्यात आली.

 

 

रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. कोरोना संसर्गामुळे यंदाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी नियम पाळून खंडोबा मंदिरात महाआरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येत होता. तीन दिवसीय यात्रेची मंगळवारी (ता.२२) सांगता होणार आहे. भाविकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन देवस्थान संस्थानचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, सचिव गंगाधर पारखे, विश्वस्त दिलीप दांडेकर, विठ्ठल देवकर, गोविंद चोपडे, रमेश चोपडे, लक्ष्मण चोपडे, लक्ष्मण सोलाट, श्रीधर झरेकर, गणेश खोरे, सुभाष पारखे, मोहन पवार, सुखदेव बनगर, विजय धुमाळ, सिंधूताई धुमाळ आदींनी केले आहे.
 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khandoba Fair Starts, Devotees Take Darshan Aurangabad News