शेतकऱ्यांनो, मोठ्या संख्येने या : अॅग्रोवन कृषी प्रदर्शन आजपासून औरंगाबादेत

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा खजिना असणारे ‘सकाळ-अॅग्रोवन कृषी प्रदर्शन औरंगाबाद येथील बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर २७ ते ३० डिसेंबर दरम्यान होत आहे. कृषी प्रदर्शनातील तयारी पूर्ण झाली आहे.

या निमित्ताने औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रयोगशील तरुण शेतकऱ्यांचा ‘अॅग्रोवन युवा शेतकरी सन्मान’ या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. 

मराठवाड्यातील आव्हानात्मक परिस्थितीत शेती करणारा येथील बळीराजा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात आपली वेगळी ओळख बाळगून आहे. अगदी ‘कडवंची’च्या रूपाने महाराष्ट्रातील ‘इस्त्रायल’ही येथे पाहावयास मिळते.

अशाच प्रचंड जिद्द, मेहनत आणि प्रयोगशीलता ठेवून लढणाऱ्या येथील ५१ युवा शेतकऱ्यांचा सन्मान २७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘सकाळ अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात होणार आहे.

  • तज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन
  • नामांकित कंपन्या, संशोधन संस्थांचा सहभाग 
  • बॅंका, खते, कीटकनाशके, बियाणे उद्योगांचे स्टॉल
  • कृषी अवजारे, यंत्रे, ड्रीप, प्रक्रिया उद्योगांचाही सहभाग

या पुरस्कारार्थींमध्ये ४० शेतकरी आणि ११ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी विविध पीकपद्धती, फळबाग, गटशेती, प्रक्रिया उद्योग, पूरक उद्योगांमध्ये वेगळी ओळख तयार केली आहे; तसेच मराठवाड्यातील शेतीला नवी दिशा दिली आहे. २८ डिसेंबरपासून तीन दिवस चालणाऱ्या प्रत्येक चर्चासत्राच्या वेळेस १० युवा शेतकऱ्यांचा सन्मान होणार आहे. 

अॅग्रोवन कृषी प्रदर्शनासाठी पारस ग्रुप हे मुख्य प्रायोजक आहेत. महाफिड फर्टिलायझर्स, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), पूर्वा केमटेक, गरवारे टेक्निकल फायबर्स आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) हे सहप्रायोजक आहेत. प्रदर्शनामध्ये आधुनिक शेतीची तंत्रे प्रात्यक्षिकांसह सादर केली जाणार आहेत.

प्रदर्शनात बागायती, कोरडवाहू तसेच संरक्षित शेतीमधील उपायांवर मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांना शास्त्रज्ञ, अभ्यासकांशी संवाद साधता येईल. विविध कंपन्यांची उत्पादने तसेच नवतंत्रांची ओळख देखील होणार आहे. 

शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे क्षेत्रातील कंपन्या; तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्डस्टोअर उद्योग, ठिबक व तुषार सिंचन, टिश्‍यूकल्चर, ग्रीन हाउस टेक्नॉलॉजी आणि इम्प्लिमेंट्स, कृषी साहित्य ग्रेडिंग, वेईंग, सॉर्टिंग अवजारे उत्पादन क्षेत्रातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

प्रवेश निःशुल्क, बक्षिसे जिंकण्याची संधी

सकाळ-अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र सर्व शेतकऱ्यांची नाव नोंदणी केली जाणार आहे. या नोंदणीतून दररोज ड्रॉ काढण्यात येणार असून, यातून शेतकऱ्यांना रोहित अॅग्रोद्वारे पेरणी यंत्र, अॅण्डसलाईटद्वारे बॅटरी, लोकनेते इंजिनिअरिंगकडून नांगर जिंकण्याची संधी आहे.

उपयुक्त चर्चासत्रे

कृषी प्रदर्शनात २८ पासून सलग तीन दिवस गटशेतीतून समृद्धी, शेतमाल प्रक्रिया उद्योगाची उभारणी, नैसर्गिक शेतीचे अनुभव, मधमाशीपालन ः एक पूरक उद्योग, पीकपद्धती बदलातून किफायतशीर शेती या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com