
वेरुळ येथील मालोजी राजे भोसले यांची गढी हे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य घटक असुन त्याचे जतन करण्याबरोबरच संवर्धन व विकास करण्यात येईल.
खुलताबाद (जि.औरंगाबाद) : वेरुळ (ता.खुलताबाद) येथील मालोजीराजे भोसले यांच्या मालकीच्या गढीचे संवर्धन व जतन करण्यासाठी शासनाने ठरविले आहे. या गढीमध्ये गढीचे काही पुरातन अवशेष उत्खननात सापडले आहे. या अवशेषाचे जतन करण्यासाठी संबधिताना सूचना दिल्या आहेत. या गढीचे संवर्धन व जतन करण्यासाठी पाच कोटींचा नव्याने आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जगप्रसिध्द वेरुळ लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी लवकर इलेक्ट्रिक बसेसची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी (ता.16) वेरुळ येथे पत्रकार परिषदेत दिली.
तालुक्यातील वेरुळ येथील शहाजीराजे भोसले स्मारकास मंगळवारी श्री.देशमुख यांनी भेट देऊन स्मारक परिसराची पाहणी केली. शहाजीराजे भोसले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करीत अभिवादन केले. त्यानंतर इतिहास अभ्यासक, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत मालोजीराजे भोसले गढीची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. यानंतर वेरुळ येथील एका हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या वेळी पत्रकार परिषदेद्वारे माहिती देताना सांस्कृतिक मंत्री देशमुख यांनी गड, किल्ले, प्राचीन मंदिरे यांच्या विकासाबाबत महाविकास आघाडी सरकार संवेदनशील आहे. वेरुळ येथील मालोजी राजे भोसले यांची गढी हे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य घटक असुन त्याचे जतन करण्याबरोबरच संवर्धन व विकास करण्यात येईल. यासाठी पाच कोटींचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संपादन - गणेश पिटेकर