कोरोनाच्या सावटातच शाळा, महाविद्यालये सुरू; विद्यार्थी संख्या वाढली

संदीप लांडगे
Tuesday, 16 February 2021

दहा, अकरा महिन्यानंतर प्राथमिकस्तर वगळता इतर वर्ग सुरू झाले. नववी ते बारावी २३ नोव्हेंबरपासून या वर्गाच्या शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.

औरंगाबाद : जिल्ह्यात ता.२३ नोव्हेंबर, तर शहरात चार जानेवारीपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले. त्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळादेखील सुरु झाल्या. सद्यःस्थितीत नववी ते बारावी उपस्थितीचे प्रमाण ५६.६२ टक्क्यांपर्यंत तर पाचवी ते आठवीचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या आढाव्यानंतर ही आकडेवारी समोर आली. कोरोना महामारीमुळे १६ मार्चपासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले.

वाचा : चोरांनीही हात टेकले! दुचाकीची चोरी जमलीच नाय, चक्क गाडीचे स्पेअर पार्ट खोलून नेले

दहा, अकरा महिन्यानंतर प्राथमिकस्तर वगळता इतर वर्ग सुरू झाले. नववी ते बारावी २३ नोव्हेंबरपासून या वर्गाच्या शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. पाचवी ते आठवीच्या शाळा जानेवारीमध्ये सुरू झाल्या. पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावीपर्यंत उपस्थितीचे प्रमाण साठ टक्क्याच्या आत आहे. नववी, बारावीचे वर्ग सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. मात्र, उपस्थितीचे प्रमाण वाढलेले नाही. दहावीचे ६२.९८ टक्के उपस्थिती नोंदविण्यात आली तर बारावीची ४७.४१ टक्के अशी आहे.

वाचा : लोकांच्या त्रासामुळे मी आत्महत्या करत आहे, असे सुसाईड नोट लिहून औरंगाबादचा उद्योजक बेपत्ता

नववी ते बारावीपर्यंत उपस्थितीचे एकूण प्रमाण ५६.५२ टक्के असे आहे. नववी ते बारावीपर्यंत दोन लाख तीन हजार ९५० तर पाचवी ते आठवीची विद्यार्थी संख्या १ लाख ४६ हजार ७८५ अशी आहे. या आठवड्यातील ही आकडेवारी आहे. शिक्षणमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर आल्यानंतर याबाबत आढावा घेण्याची शक्यता आहे. ऑफलाइनसह उर्वरित विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासक्रमाला प्राधान्य देत असल्याचे सांगण्यात येते. सोमवारी शहरातील दोन शाळांमध्ये शिक्षक कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे या शाळा दहा दिवस बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे. याचा परिणाम इतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर होण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तवली आहे.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under Corona Shadow Schools, Colleges Reopen Aurangabad Latest News