सिल्लोड तालुक्यात संतप्त जमावाची पोलिसांवर दगडफेक

सचिन चोबे
Saturday, 12 December 2020

पोलिस पाटील महिलेने त्रासाला कंटाळून विष प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल करण्याऐवजी केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

सिल्लोड (औरंगाबाद ) : केळगाव (ता.सिल्लोड) येथे संतप्त जमावाने शुक्रवार (ता.11) रोजी सायंकाळच्या सुमारास पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली.

पोलिस पाटील महिलेने त्रासाला कंटाळून विष प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल करण्याऐवजी केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत संतप्त ग्रामस्थांनी केळगावात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या दंगा काबू पथकाला हुसकावले. संतप्त गावक-यांनी पोलिसांच्या दोन गाड्या फोडून जमाव आरोपींच्या घराची नासधूस करायला लागले. 
जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांनी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला.

हे ही वाचा : अंधश्रध्देचा बळी ; महादेवाच्या पिंडीवरचं युवकाने गळा चिरुन केेली आत्महत्या

दगडफेक करणा-या जमावातील चार ते पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. प्रकरणातील संशयित आरोपी गावात नसल्यामुळे जमावाच्या तडाख्यातून वाचले. घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहूल, सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले.

त्यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली. घटनेनंतर केळगावात तनावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. घटनेचे गांभीर्य बघता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रात्री उशिरा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील केळगावकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An angry mob pelted stones at police in Kelgaon on Friday