जिल्हा आरोग्य अधिकारी नियुक्त करा, आमदार चव्हाण यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

दुर्गादास रणनवरे
Tuesday, 15 September 2020

जिल्हा परिषदेला पूर्ण वेळ जिल्हा आरोग्य अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी आमदार चव्हाण यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान सुरु असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे पूर्ण वेळ जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची तसेच रुग्णांची हेळसांड होत आहे. या पार्श्वभूमीवर "सकाळ" मध्ये शुक्रवारी (ता. ११) प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेला पूर्ण वेळ जिल्हा आरोग्य अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी आमदार चव्हाण यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

जिल्हा परिषदेत पूर्ण वेळ डीएचओ नसल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत. मात्र जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारीपदी प्रभारी अधिकारी असल्याने पूर्ण वेळ"डीएचओ''नियुक्त करा भागात कोरोनाविषयी केलेल्या कामांची योग्य ती माहिती मिळत नाही.

मुलाने कुत्र्याला दगड मारल्याचा जाब विचारताच चाकू हल्ला, औरंगाबादेत धक्कादायक...

तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सर्व सामान्य रूग्णांना आवश्यक त्या सोयी सुविधा मिळत नसल्याने ग्रामीण भागातील रूग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी शहरात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षमपणे हातळण्यासाठी जिल्हा परिषदेला पूर्णवेळ जिल्हा आरोग्य अधिकारी पदाची आवश्यकता असलयाने तात्काळ त्यांची नियुक्ती करावी.

घाटीमध्ये मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे
आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) परिसरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. याठिकाणी एकूण २५० खाटा असून त्यापैकी २१८ खाटा या कोरोनाच्या रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या २१८ खाटांसाठी याठिकाणी सध्या कंत्राटी पध्दतीने ४५ चतुर्थश्रेणी कर्मचारी, ११० परिचारिका, ३६ निवासी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे अजून जवळपास १०० कर्मचार्‍यांची कमतरता भासत आहे.

औरंगबाद जिल्ह्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र बुधवारपासून रात्री नऊनंतर बाजारपेठा...

बेड शिल्लक, रुग्णांची गैरसोय
मात्र पुरेशा मनुष्यबळ अभावी सध्या केवळ २९ बेडच रूग्णसेवेत आहेत. एकीकडे शहरातील खाजगी रूग्णालयांमधील आयसीयू बेड फुल झाल्याने घाटीत मराठवाड्यासह खान्देश, विदर्भातून देखील कोरोनाच्या गंभीर रूग्णांची सं‘या वाढत आहे. घाटीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २१ आयसीयू बेड शिल्लक असताना मनुष्यबळाअभावी रूग्णांवर उपचार करणे शक्य होत नसल्याचे आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे.आपण स्वत: बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आमदार चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appoint District Health Officer, MLA Satish Chavan Request To Health Minister