
सोमवारी २१ डिसेंबरला सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात एक विलोभनीय खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे.
औरंगाबाद : सोमवारी २१ डिसेंबरला सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात एक विलोभनीय खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह गुरू व सुंदर कडी असलेल्या शनी ग्रहाची युती पाहता येणार आहे. सायंकाळी साडे पाच वाजता सूर्यास्त होणार असून साधारण पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी ही खगोलीय घटना डोळ्यांनी पाहता येणार आहे.
प्राप्त माहितीनूसार, तेजस्वी गुरू ग्रहाच्या वरील बाजुला शनी ग्रह दिसेल. आणखी वरील भागात सप्तमीची चंद्राची कोरही दिसेल.
रात्री आठ वाजेपर्यंत साधारणः दोन तास ही घटना पाहता येईल. या युतीच्या वेळी शनी व गुरू ग्रह व पृथ्वी दरम्यान कोनीय अंतर हे पोर्णीमेच्या चंद्राच्या आकारा पेक्षा १/५ म्हणजेच ०६ कोनीय मिनिटे इतके कमी राहील. दोन्ही ग्रह जवळ येणार असल्याने डोळ्यांनी ते दोन्ही एकच असल्याचे भासणार असून गुरू ग्रहाची तेजस्वीता -२.० व शनी ग्रहाची तेजस्वीता ही ०.७ इतकी असेल. गुरू ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी ११.८६ पृथ्वी वर्षे लागतात; तर शनी ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी २९.५ पृथ्वी वर्षे लागतात.
साधारण दर वीस वर्षांत या दोन्ही ग्रहांची युती आकाशात पाहायला मिळते. परंतू दोन्ही मधील ०६ कोनीय मिनीटे अंतर हे ३९७ वर्षानंतर पाहायला मिळणार आहे. या आधी गॅलिलीओद्वारा दुर्बिण शोधानंतर १६ जूलै १६२३ ला पहिली व आजची ही दुसरीच घटना असेल. कोनीय अंतर इतक्या जवळ असले तरी गुरू-पृथ्वी अंतर हे ८८ कोटी ६७ लाख ४८ हजार ५४४ किलोमिटर व शनी-पृथ्वी अंतर हे १६० कोटी ९३ लाख ४४ हजार किलोमीटर राहील.
‘एमजीएम’ खगोलअंतराळ केंद्रात पाहायला मिळणार
‘एमजीएम’च्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्रातर्फे गुरू, शनिच्या या महायुतीचे निरीक्षण मोठ्या दुर्बिणीद्वारे केले जाईल. या खगोलीय युतीचे निरीक्षण १७ ते २२ डिसेंबरदरम्यान केले जात आहे. या सहा दिवसांत रोज सायंकाळी सव्वा सहा ते सव्वा सातपर्यंत नागरिकांना दुर्बिणीद्वारे ही घटना पाहण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी नागरिकांना विज्ञान केंद्रात प्रत्यक्ष येऊन पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. कोवीड आरोग्य सुरक्षा नियमानुसार ११ ते ६० या वयोगटातील नागरिकांना या खगोलीय घटनेचा आनंद घेता येणार असल्याची माहिती विज्ञान केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर यांच्यामार्फत देण्यात आली.
Edited - Ganesh Pitekar