बीडमध्ये केमिकलच्या स्फोटात एक ठार, हादऱ्याने बाजूच्या इमारतीच्या काचेच्या खिडक्याही तुटल्या

दत्ता देशमुख
Friday, 18 December 2020

प्लायवूडच्या दुकानातील केमिकलच्या स्फोटात एक जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) बीड शहरात घडली.

बीड : प्लायवूडच्या दुकानातील केमिकलच्या स्फोटात एक जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) शहरात घडली. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शहरातील जिजामाता चौकातील चंपावती प्लायवूड या दुकानाच्या गोदामात हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी होती कि तरुणाचे दोन्ही हाताचे पंजे व पाय तुटून बाजूला पडले. तर, हादऱ्याने बाजूच्या इमारतीच्या काचेच्या खिडक्याही फुटल्या. एक किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटाचा आवाज आला. अनिरुद्ध सर्जेराव पांचाळ (वय ३०, रा. सेलू, ता. गेवराई) असे स्फोटात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
घटनास्थळी बॉम्ब शोधक, दहशतवादीविरोधी पथकासह श्‍वान पथक आले होते.

 

शुक्रवारी साधारण १२ वाजेच्या दरम्यान शहरातील मसरतनगर भागातील जिजामाता चौकातील चंपावती प्लायवूड या दुकानातील गोदामात असलेल्या हार्डनर या द्रवाच्या कॅनचा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती कि यात अनिरुद्ध पांचाळ हा थेट गोदामाच्या बाहेर रिक्षावर उडून पडला. त्याच्या दोन्ही हाताचे पंजे व पायाचे तुटून पडले. स्फोटाचे हादरेही दुरवरपर्यंत जाणवले तर आवाज एक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. हादऱ्याने बाजूच्या इमारतीच्या काचेच्या खिडक्याही तुटून पडल्या.

 

घटनेची माहीती मिळताच शहर ठाण्याच्या पोलिसांसह दहशतवादीविरोधी पथक, श्‍वानपथक आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी धावले. या स्फोटाच्या हादऱ्यात गोदामाबाहेरील स्कुटी (एमएच २३ बीए ४८५०) खाली पडली तर बाहेर उभा असलेला रिक्षाचेही नुकसान झाले. दरम्यान, रिक्षा चालक सुधीर जगताप व कामगार किसन मुणे जखमी झाले आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Person Died In Chemical Explosion Beed News