भाजपा शिवसेना एकत्र! वर्षाअखेर पालिकेच्या निवडणुका

बाळासाहेब लोणे
Monday, 15 February 2021

राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा वार सुरू असताना गंगापूर शहरात भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकत्रित संसार थाटला आहे

गंगापूर (औरंगाबाद): राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा वार सुरू असताना गंगापूर शहरात भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकत्रित संसार थाटला आहे. वर्षाअखेर पालिकेच्या निवडणुका असून या निवडणुकीत काय होते, याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले असून काही महिन्यांत आचारसंहिता लागणार असून यापूर्वीच शहरात विविध विकास कामांचे लोकार्पण करण्याचा सध्या धडाका सुरू असून येत्या काही दिवसांत काय येथील राजकारण काय वळण घेईल हे सद्या तरी सांगणे कठीण आहे.

शहरात १३ वर्ष पालिकेवर अबाधित सत्ता गाजवलेले माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी देखील बोगस कामांवर आक्षेप घेत मजबूत विरोधकाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांची कसरत होत आहे.

Corona Updates : औरंगाबादेत ५८ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ४६ हजार ८९ कोरोनामुक्त

शुक्रवारी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. यात भाजपचे आमदार प्रशांत बंब उद्घाटक तर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राज्यात निवडणुकीचा फंडा काहीही असू शकतो, त्यानुषंगाने नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील, प्रदीप पाटील हे सर्वपक्षीय हितसंबंध जोपासताना सद्या दिसत आहे.

जावई हर्षवर्धन जाधव यांचे नाव काढताच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे भडकले

"विरोधकांना विकास कामे बघवली जात नसल्याने वायफळ तक्रारी करणे सुरू आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. जिल्ह्यात गंगापूर शहराचे नाव उंचावत आहे. विरोधकांचे काम विरोध करणे हेच आहे. आम्ही काय केले हे जनतेला माहीत आहे"
- वंदना पाटील (नगराध्यक्षा)

"सध्या शहरात फक्त दर्जाहीन बोगस कामांचा धडाका सुरू आहे. तपासणी अहवाल चुकीच्या संस्थेकडून घेऊन शासनाची फसवणूक केली जात आहे. मलनिस्सारण प्रकल्पासाठी बेकायदेशीर जमीन खरेदी केली आहे. तसेच गटार योजना केली. त्या ठिकाणी खडीकरण करणे आवश्यक असताना तसे झालेले नाही."
- संजय जाधव (विरोधी माजी नगराध्यक्ष)

शासनाच्या नियमाला धरूनच सर्व कामे सुरू आहेत. विरोधकांना विकास सहन होत नाही. आम्ही विकास कामानेच जनतेला सामोरे जाणार आहोत. भाजप-शिवसेनेच्या काळातच खऱ्या अर्थाने शहराचा नावलौकिक वाढत आहे. सर्वांच्या एकत्रित विचारातूनच विकास कामांचा प्रयत्न आहे.
- प्रदीप पाटील (नगरसेवक, भाजप)

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad breaking news shivsena and bjp allience in gangapur muncipal