त्याने केला तसला व्हिडिओ व्हायरल, आता जेलमध्ये जावे लागणार

योगेश पायघन
Sunday, 12 January 2020

विदेशात चाईल्ड पोर्नोग्राफीला बंदी असून देशातदेखील बंदी घालण्यात यावी, या अनुषंगाने पावले उचलण्यात आली आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात व्हिडिओच्या सीडीज तयार केल्या आहेत. गणकाचा आयपी ऍड्रेस अथवा वापरलेल्या मोबाईल सीमकार्ड क्रमांकावरून गुन्हे दाखल केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

औरंगाबाद -  दिल्लीच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईला सुरवात केली असून, विविध पोलिस ठाण्यांमध्ये चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी पोक्‍सो कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी पहिला गुन्हा सिडको पोलिस ठाण्यात दाखल झाला असून, छावणी व सातारा पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दिल्लीच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोला बेपत्ता आणि शोषित मुलांचे राष्ट्रीय केंद्राकडून काही लैंगिक शोषणाचे व्हिडिओ आणि फोटो मिळाले. हे व्हिडिओ एकाने फेसबुकसह इतर सोशल मीडियावर व्हायरल केले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात राज्याच्या सायबर क्राईमचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याशी संपर्क साधला. त्यांना या किळसवाण्या प्रकाराबाबत कायदेशीर कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार, राज्यातील सर्वच सायबर क्राईम पोलिस ठाण्यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा -प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

दरम्यान, सिडको पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिडकोचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले. तसेच छावणी व सातारा पोलिस ठाण्यात देखील यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सायबर क्राईमचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली. ज्या व्यक्तीने बालकांच्या लैंगिक शोषणासंदर्भीतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत त्याच्या संगणकाचा आयपी ऍड्रेस अथवा वापरलेल्या मोबाईल सीमकार्ड क्रमांकावरून गुन्हे दाखल केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हेही वाचा -मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

पोलिसच होणार तक्रारदार 
सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ डिजिटल स्वरूपाचे आहेत. संवेदनशील व गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याने ते तत्काळ दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहेत. या अनुषंगाने तांत्रिक मदतीची आवश्‍यकता असल्यास ठाण्यातील प्रभारींनी सायबर पोलिस ठाण्याची तांत्रिक मदत घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोसह स्थानिक सायबर पोलिस ठाणेसुद्धा सोशल मीडियावर लक्ष ठेवून असून असे प्रकार आढळल्यास पोलिसच तक्रारदार होणार आहेत. 

विदेशात चाईल्ड पोर्नोग्राफीला बंदी असून देशातदेखील बंदी घालण्यात यावी, या अनुषंगाने पावले उचलण्यात आली आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात व्हिडिओच्या सीडीज तयार केल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणातील आरोपीची माहिती समोर येऊ नये, म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी देखील त्याची काळजी घ्यावी. याप्रकरणी पोक्‍सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल होत आहेत. 
-कैलास देशमाने, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad CIDCO police first offense over video viral