नव्या पाणीपुरवठा योजनेच्या निविदेला का दिली चौथ्यांदा मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पाणी पुरवठा याेजनेच्या पहिल्या टप्प्यातील 1308 कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली होती. या निविदेला चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून, आता 18 जानेवारीला प्री-बिड होईल, तर 25 पर्यंत कंत्राटदाराला निविदा भरता येतील, असे अधीक्षक अभियंता अजयसिंग यांनी बुधवारी (ता. 15) सांगितले. 

औरंगाबाद- राज्य शासनाने शहरासाठी 1680 कोटी रुपयांची योजना मंजूर केली असून, निविदा प्रक्रिया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविली जात आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 1308 कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली होती. या निविदेला चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून, आता 18 जानेवारीला प्री-बिड होईल, तर 25 पर्यंत कंत्राटदाराला निविदा भरता येतील, असे अधीक्षक अभियंता अजयसिंग यांनी बुधवारी (ता. 15) सांगितले. 

जीवन प्राधिकरणाने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सप्टेंबर महिन्यात 1308 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. निविदा दाखल करण्यासाठी आठ नोव्हेंबरची मुदत होती. त्यानुसार मुंबई येथे प्री-बिड घेण्यात आली. यावेळी निविदा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी इच्छुक कंत्राटदारांनी केली. त्यानुसार 15 दिवसांची मुदत वाढवून 22 नोव्हेंबर करण्यात आली. या मुदतवाढीनंतरही निविदेचा अभ्यास करण्यासाठी कंत्राटदारांनी वेळ मागितला. म्हणून निविदा भरण्यासाठी पुन्हा महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली. 22 डिसेंबरपर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.

क्लिक कराः खासदार इम्तियाज जलील का म्हणाले... माझी मान शरमेने खाली गेली

त्यावर कंत्राटदारांनी आक्षेप सादर केल्यामुळे पुन्हा 15 जानेवारी 2020 पर्यंत निविदा स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार निविदा स्वीकारण्याची मुदत बुधवारी (ता. 15) संपली. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजयसिंग यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी निविदेस पुन्हा दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार आता 18 ला प्रि-बिड होणार आहे, तर 25 जानेवारीपर्यंत निविदा स्वीकारल्या जातील. 

भाववाढ निर्देशांकावरून अडले घोडे 
तीन वर्षांच्या कालावधीत योजनेसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीमध्ये होणारी वाढ स्वीकारली जाणार नाही, अशी अट निविदेत टाकण्यात आली आहे. मात्र याचा फटका कंत्राटदारांना आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी निविदेमध्ये बदल करावा, अशी मागणी नगरविकास विभागाकडे केली आहे. 

सहा दिवसांनंतरही आले नाही पत्र 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नऊ जानेवारीला घेतलेल्या बैठकीत योजनेची निविदा प्रक्रिया अंतिम करून कार्यारंभ आदेश देण्यासंदर्भातील पत्र चार दिवसांत दिले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र हे पत्र अद्याप प्राधिकरणाला प्राप्त झालेले नाही. भाववाढ निर्देशांकाचा निर्णय व हे पत्र सोबतच येण्याची शक्‍यता आहे. 

क्लिक कराः ब्लॅकलिस्टेड कंत्राटदारात शिवसेनेला इंटरेस्ट

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad City water supply