कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या सहा शिकवण्यांना दंड, ४३ ठिकाणी तपासण्या

माधव इतबारे
Friday, 19 February 2021

कमी झालेला कोरोना संसर्ग गेल्या आठवड्यापासून झपाट्याने वाढत आहे. शहरात रुग्णांची संख्या २० पेक्षा खाली आली होती. मात्र दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे.

औरंगाबाद : कोरोना संसर्ग शहरात झपाट्याने वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने नियम न पाळणारे मंगल कार्यालये व शिकवण्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून (ता. १८) तपासणी सुरू करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी सहा शिकवण्यांवर कारवाई करून २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई नागरिक मित्र पथकामार्फत करण्यात आली.

कमी झालेला कोरोना संसर्ग गेल्या आठवड्यापासून झपाट्याने वाढत आहे. शहरात रुग्णांची संख्या २० पेक्षा खाली आली होती. मात्र दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात तब्बल १५६ रुग्णांची भर पडली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महापालिकेने नव्याने नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमांसाठी फक्त ५० व्यक्तींना परवानगी असताना शेकडो जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहेत.

तसेच शिकवण्यांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटाझरचा वापर या नियमांचे पालन होते किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या पथकांमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. दिवसभरात ४३ शिकवण्यांची तपासणी करण्यात आली. यातील सहा ठिकाणी कोरोनासंदर्भात उपाय-योजना नसल्याचे व नियम पाळले जात नसल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पथक क्रमांक पाचने चार ठिकाणी कारवाया करून प्रत्येकी पाच हजारांचा तर पथक क्रमांक चारने एका शिवणीकडून पाच हजार तर दुसऱ्याकडून एक हजार असा सहा हजारांचा दंड वसुल केल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

मंगल कार्यालयांना नोटिसा
शिकवण्याप्रमाणेच नियम न पाळणाऱ्या मंगलकार्यालयावर कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार वॉर्ड निहाय मंगल कार्यालयांना ५० जणांच्या उपस्थिती बाबतच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना नोटीस देऊन केल्या जात असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Coroan Updates Six Private Classes Fined For Not Following Corona Rules