औरंगाबाद @ २८२, सायंकाळी वाढले आठ रुग्ण

मनोज साखरे
Sunday, 3 May 2020

शहरात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढलाय. आज सायंकाळी आणखी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरातील आकडा आता
२८२ वर पोचला आहे.

औरंगाबाद : शहरात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला आहे. आज (ता. ३ मे) सायंकाळपर्यंत शहरात २५ नवे रुग्ण सापडले असून, सकाळचे १७ आणि सायंकाळचे ८ अहवाल धरून कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २८२ वर पोचला आहे, अशी माहिती घाटीच्या डीन डॉ. कानन येळीकर यांनी दिली.  

महिनाभरापूर्वी शहरात कोरोनाचे केवळ दोन रुग्ण होते. यामुळे शहरात कोरोनाची साथ आटोक्यात राहील असे वाटले होते. मात्र, आठवड्यापासून रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. गेल्या ६० तासांत औरंगाबादेत दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर १०५ रुग्णांची भर पडली असून, एकूण संख्या २८२ वर गेली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय, घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. 

परभणीतून फोन आला आणि औरंगाबादेत घडले काय...  

असे वाढले रूग्ण

शहरात शुक्रवारी (ता. एक) दिवसभरात ३९ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर तर गुरुदत्तनगर, गारखेडा परिसरातील ४७ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी हॉटस्पॉट ठरलेल्या संजयनगर, मुकुंदवाडी येथील १८, नूर कॉलनी, आसेफिया कॉलनी येथील प्रत्येकी ३, भडकलगेट येथील एक, वडगाव येथील एक, गुलाबवाडी येथील दोन, महेमूदपुरा येथील एक, सिटी चौक येथील एक, भीमनगर येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर याच भागातील रुग्णांच्या संपर्कातील सात रुग्ण सायंकाळी पॉझिटिव्ह आले. यात गुलाबवाडी, भीमनगर, संजयनगर, मुकुंदवाडी, येथील रुग्ण आहेत.

शनिवारी (ता.दोन) सकाळी नूर कॉलनीत-पाच, बायजीपुरा-११, कैलासनगर-तीन, जयभीमनगर-एक व किलेअर्क येथील-एक तसेच अन्य-दोन असे एकूण २३ रुग्ण आढळले. शनिवारी दुपारी चार वाजता टाऊन हॉल-दोन, किलेअर्क-एक, संजयनगर-एक, गौतम नगर-एक असे पाच रुग्ण वाढले. त्यानंतर रात्री १२ रूग्ण वाढले, त्यात जयभीमनगरातील ११ आणि नंदनवन कालनीतील एकाचा समावेश आहे. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

दाखल करताच मृत्यू 

नूर कॉलनीतील एका ६५ वर्षीय महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. कोरोनाचा हा नववा बळी असल्याची माहिती घाटी रुग्णालयाचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. या महिलेला आज सकाळीच गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूचे कारण ‘बायलॅट्रल न्युमोनिया ड्यु टू कोविड - १९ इन केस ऑफ डायबिटीस मेलआयटस विथ हायपरटेन्शन विथ हायपोथायरॉयडिझम’ असे नोंदवण्यात आले आहे. मृत्युपश्चात त्यांचा स्वॅब घेण्यात आलेला होता; पण त्याचा अहवाल प्रतीक्षेत होता. सायंकाळी हा अहवाल प्राप्त झाला, तो कोविड - १९ पॉझिटिव्ह आला, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Updates Now 282 Patients In Total