परभणीतून फोन आला अन् औरंगाबादेत घडले काय... 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

गुरुवारी (ता. ३०) मसनतपूर आणि चिकलठाणा व गुरुदत्तनगरमधये रुग्ण आढळून आले. या सर्वांच्या संपर्कातील ५३ जणांना क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे टास्क फोर्सच्या प्रमुख विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी सांगितले. 

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, गुरुवारी (ता. ३०) मसनतपूर आणि चिकलठाणा व गुरुदत्तनगरमधये रुग्ण आढळून आले. या सर्वांच्या संपर्कातील ५३ जणांना क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे टास्क फोर्सच्या प्रमुख विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी सांगितले. दरम्यान परभणीहून फोन आल्याने शहरातील नागरिकांची तपासणी करण्यात आली. 

शहरातील दहा वॉर्ड कोरोनासाठी रेड झोन बनले होते. किलेअर्क, नूर कॉलनी, आसेफिया कॉलनी, जयभीमनगर या भागांत पॉझिटिव्ह रुग्ण सर्वाधिक आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ समतानगर, भीमनगर, आरेफ कॉलनी या भागांतील रुग्णांचा समावेश आहे. आता अशोकनगर-मसनतपूर, चिकलठाणा, भवानीनगर वॉर्डातील गुरुदत्तनगर, गारखेडा परिसर या ठिकाणी रुग्ण आढळून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काल साताऱ्यातील भारतीय बटालियनमधील जवान पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील १४ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे; तसेच नारेगाव-ब्रिजवाडीजवळील मसनतपूर भागातील अशोकनगरमध्ये राहणारी व्यक्ती जिल्हा रुग्णालयात (मिनी घाटी) कामाला असून, दोन दिवसांपासून सर्दी, तापाने आजारी आहे.

त्यामुळे त्याने कोरोना तपासणी करून घेतली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. म्हणून महापालिकेच्या टास्क फोर्सच्या पथकाने गुरुवारी सकाळी या व्यक्तीच्या संपर्कातील ३० जणांना क्वारंटाइन केले. हाय रिस्क संपर्कातील १५ व लो रिस्कमधील १५ अशा व्यक्तींना क्वारंटाइन करून त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली; तसेच चिकलठाणा भागातील व्यक्तीदेखील मिनी घाटीत कामाला आहे. त्याच्या घरातील हाय रिस्क संपर्कातील चारजणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. भवानीनगर वॉर्डातील दत्तनगरमधील वाहनचालक असलेली व्यक्ती कोरोनाबाधित निघाली. या व्यक्तीच्या संपर्कातील सुमारे तीन जणांना टास्क फोर्सच्या पथकाने घरी जाऊन क्वारंटाइन केले. यातील १७ जण हाय रिस्क संपर्कातील तर १३ जण लो रिस्क संपर्कातील आहेत. हा वाहनचालक नुकताच गुजरातमध्ये जाऊन आल्याचे समोर आले आहे. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

आई गेल्याचं दुःख मोठं, पण गोडजेवण घालण्याऐवजी यांनी...

पळून गेलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी...

गारखेड्यात तपासणी 
लॉकडाउनमध्येही अनेकजण प्रवास करीत असल्याने रुग्णांचे कनेक्शन वाढत आहे. परभणी जिल्ह्यातून एक महिला गारखेडा परिसरातील इंदिरानगर भागात आल्याची माहिती महापालिकेला देण्यात आली होती. त्यानुसार टास्क फोर्सने इंदिरानगर भागात महिलेच्या घराचा शोध घेतला. मात्र महिला घरात आढळून आली नाही. या महिलेच्या संपर्कातील पाचजणांना क्वारंटाइन करून त्यांची तपासणी केली असल्याचे विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad