धक्कादायक! औरंगाबादच्या बजाजनगरमध्ये डोक्यात दगड घालून एकाचा निर्घृण खून

रामराव भराड
Friday, 22 January 2021

मात्र सोमनाथ राठोड याचा मारेकरी कोण व त्याने नेमके कोणत्या कारणावरून खून केला. याबाबतचा तपास सुरू आहे.

वाळुज (जि.औरंगाबाद) : कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी कारणावरून एका साठ वर्षीय व्यक्तीच्या डोक्‍यात दगड घालून निर्घृणपणे खून केला आहे. बजाजनगर येथील पद्मपाणी बुद्धविहाराच्या गेटमध्ये घडलेला हा प्रकार शुक्रवारी (ता.२२) सकाळी उघडकीस आला आहे. आडगाव (सरक) (ता.जि.औरंगाबाद) येथील सोमिनाथ भुरा राठोड (वय ६०) असे खून झालेल्या व्यक्तीमाचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने कोणत्या तरी कारणावरून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

त्यानंतर तो तसाच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, पोलिस उपनिरीक्षक सतीश पंडित, प्रशांत गंभीरराव, सहायक पोलिस उपनिरीक्षक आर.डी.वडगावकर, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख, योगेश धोंडरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

दरम्यान पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास कामे सूचना केल्या. तसेच श्वानपथकानेही माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमनाथ राठोड याचा मारेकरी कोण व त्याने नेमके कोणत्या कारणावरून खून केला. याबाबतचा तपास सुरू आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Crime News Man Killed In Bajajnagar