कामासाठी गेलेला व्यक्ती कुटुंबीयांना मृतावस्थेत सापडला, शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार

नानासाहेब जंजाळ
Wednesday, 7 April 2021

अंमळनेर (ता.गंगापूर) येथील रहिवाशी बाळकृष्ण बाजीराव गवारे (वय 39) हे तीर्थपुरी येथील साखर कारखान्यात तोडी मुकादम म्हणून काम करतात.

शेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : मुरमी (ता.गंगापूर) शिवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर व्यक्तीचा घात की अपघात असा सशंय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या विषयी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली आहे. रविवारी (ता.चार) राहत्या घरातून निघालेल्या ऊसतोड मुकादमाचा मृतदेह आज बुधवारी (ता.सात) ईसारवाडी फाटा ते शेंदूरवादा महामार्गालगत मुरमी शिवारात आढळून आला. पोलिसांनी याविषयी आकस्मिक मृत्युची नोंद घेतली आहे.  या विषयी मिळालेली माहिती अशी की, अंमळनेर (ता.गंगापूर) येथील रहिवाशी बाळकृष्ण बाजीराव गवारे (वय 39) हे तीर्थपुरी येथील साखर कारखान्यात तोडी मुकादम म्हणून काम करतात. रविवारी सकाळी ते स्वतः आपल्या घरून दुचाकीने  जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकीने दुसऱ्या दिवशी सोमवारी परत निघाले होते.

दोन आठवड्यात दीड हजार प्रवासी आढळले पॉझिटिव्ह, औरंगाबाद महापालिकेला संसर्ग रोखण्यात यश 

त्या दिवशी रात्री १० वाजेच्या दरम्यान त्यांनी रस्त्यावरील ढोरकीनजवळील हाॅटेलमध्ये मित्रासोबत जेवण केले. त्यानंतर परतीच्या प्रवासातच रात्री ११ वाजता त्यांच्या पाठीमागे दोन गाड्या लागल्याची माहीती त्यांनी फोनवर आपल्या कुटुंबीयांना दिल्याचे त्यांचे नातेवाईक सांगतात. तिसरा दिवस मंगळवार उजाडला तरीही सदर बाळकृष्ण हे घरी आलेच नसल्याने कुटुंबातील व्यक्तीनी त्यांचा शोध घेणे सुरू केले. अशातच मुरमीचे पोलिस पाटील सुभाष साखरे यांना आज बुधवारी सकाळी शेंदूरवादा महामार्गावरील मुरमी शिवारात एक व्यक्ती मृतावस्थेत पडून असल्याचे माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी सदरची माहिती वाळूज पोलिसांना कळविली. माहिती मिळताच वाळूजचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उबंरे, सहायक फौजदार नारायण बुट्टे, पोलिस अंमलदार पाडुंरंग शेळके, प्रदीप बोरूडे आदींनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शोध घेत असलेल्या सदर कुटुंबातील व्यक्तींना यावेळी घटनास्थळी बोलावून ओळख पटविण्याचे सांगितले.

कोरोनाचा वाढता आलेख, बीड जिल्ह्यात मृत करोना रुग्णांवर सामुहिक अंत्यसंस्कार

त्यावेळी सदर मृत व्यक्ती बाळकृष्ण गवारे असल्याची माहीती कुटुंबानी पोलिसांना दिली. सदरील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. उत्तरीय तपासणी होताच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी सात वाजता शोकाकुळ वातावरणात बाळकृष्ण गवारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याविषयी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत पोतद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके हे करीत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Crime News Relatives Found Their Family Chief Dead Found In Murmi Gangapur