औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 73 टक्के प्रसुती नैसर्गीक

योेगेश पायघन
बुधवार, 1 जानेवारी 2020

माता मृत्यू होण्याच्या कारणांमध्ये प्रसूतीदरम्यान रक्तस्राव, रक्तदाब, कावीळ, पूर्वीच्या गर्भपातातील संसर्ग, आदी कारणे असल्याचे स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडाप्पा यांनी सांगितले.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील स्त्रीआरोग्य व प्रसूतीशास्त्र विभागात 19 हजार 322 गरोदरमातांच्या प्रसूती झाल्या. त्यापैकी 73 टक्के (14,202) महिलांची प्रसूती नैसर्गिकरीत्या तर 26 टक्के (5,120) महिलांची सिझेरीयन प्रसुती करण्यात आल्या. नैसर्गिक व सुरक्षित प्रसुतीची ओळख बनवणाऱ्या या विभागाने वर्षभरात अनेक राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय प्रकल्पांतही आपला ठसा उमटवला आहे.

घाटी रुग्णालयात 2019 या वर्षात 19 हजार 322 प्रसुती झाल्या. आहे त्या परिस्थितीत उपचार गुणवत्ता सुधारण्यासाठी व सुरक्षित प्रसुती करणाऱ्या डॉक्‍टर आणि परिचारिकांचा बुधवारी (ता. एक) सत्कार करण्यात आला. उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, डॉ. सिराज बेग यांच्या हस्ते या विभागातील डॉक्‍टर, परिचारिकांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. प्रवीण ठाकरे, डॉ. स्वाती बडगीरे, डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. रुपाली गायकवाड, डॉ. अंकिता शहा, डॉ. विजय कल्याणकर, डॉ. राहुल इंगळे, डॉ. पूजा मोटे, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. संजय पगारे, डॉ. कनीस फातेमा, डॉ. अश्विनी कौल्लूर यांच्यासह निवासी डॉक्‍टर, परिचारिका उपस्थित होते.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

सरसकट रेफर चिंताजनक 
गरोदरमातांना आरोग्य विभागाचे रुग्णालये असताना ग्रामीण भागांतून प्रसूतीसाठी रेफर करण्याचे प्रमाण चिंताजणक आहे. वर्षभरात घाटीत रेफर केलेल्या 75, तर घाटीच्या स्त्रीरोग विभागात नियमित उपचार घेणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेद्वारे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या 294 गरोदरमातांची प्रसूती झाली. दरम्यान, अपघात विभागात बनविण्यात आलेल्या प्रसूती कक्षात 270 प्रसूती झाल्या. माता मृत्यू होण्याच्या कारणांमध्ये प्रसूतीदरम्यान रक्तस्राव, रक्तदाब, कावीळ, पूर्वीच्या गर्भपातातील संसर्ग, आदी कारणे असल्याचे स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडाप्पा यांनी सांगितले. तर प्रत्येक वर्षी नैसर्गिक प्रसूतीचा आलेख हा वाढताच राहिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ठ केले. 

क्षमतेपेक्षा दुप्पट भार 
घाटीच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात दररोज 50 ते 60 प्रसूती होतात. विभागाला 120 खाटांची आवश्‍यकता असतांना 210 खाटांची सुविधा दिली जाते. त्यावर दररोज अडिचशेहून अधिक महिला भरती होतात. त्यामुळे फ्लोअरबेडची वेळ रुग्णांवर येते. तर वर्षभर कोणत्याही परिस्थितीत 24 तास 12 जणांच्या डॉक्‍टरांचा चमू आपत्कालीन सेवा देतो. राज्यातील सर्वाधिक प्रसुती सख्या असलेल्या या विभागाला अद्ययावत पायाभुत सेवा सुविधांची गरज आहे. 

वर्षभरातील आकडेवारी 

 • 9 हजार 414 मुलांचा, तर 8 हजार 847 मुलींचा जन्म 
 • 295 जुळे तर 5 तिळ्यांचा समावेश 
 • 648 शिशु जन्मतः मृत 
 • 26 टक्के सिझेरीयन तर 73 टक्के नैसर्गिक प्रसुती 
 • रेफर केलेल्या 75 महिलांचा मृत्यू 
 • घाटीत नियमित उपचार घेणाऱ्या एका महिलेचाही मृत्यू 
  वर्ष : प्रसुती संख्या 
  2019 : 19,332 
  2018 : 18,461 
  2017 : 17,937 
  2016 : 15,685 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Aurangabad Ghati Hospital, 73% of deliveries are natural