esakal | Aurangabad Graduate Election Analysis : सतीश चव्हाण पुन्हा ‘पॉवरफुल्ल’, महाविकास आघाडीने वाढविले बळ
sakal

बोलून बातमी शोधा

Satish Chavan Win Aurangabad Graduate Constituency Election

तब्बल बारा वर्षांपासून सतीश चव्हाण हे मतदारसंघातील आमदार व जनमानसांतील चेहरा म्हणून परिचित आहेत.

Aurangabad Graduate Election Analysis : सतीश चव्हाण पुन्हा ‘पॉवरफुल्ल’, महाविकास आघाडीने वाढविले बळ

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : तब्बल बारा वर्षांपासून सतीश चव्हाण हे मतदारसंघातील आमदार व जनमानसांतील चेहरा म्हणून परिचित आहेत. यासह कामातील चुणूक, सर्वांना सोबत घेण्याची व मदत करण्याची वृत्ती, दांडगा सातत्यपूर्ण संपर्क, एक ते दीड वर्षापासूनची निवडणुकीची तयारी व चोख नियोजन आणि शिवसेनेमुळे महाविकास आघाडीचे वाढलेले बळ या सर्व कारणांनी सतीश चव्हाण यांचा विजय सुकर झाला.


राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यातील ताकदवान नेते म्हणून सतीश चव्हाण यांची ओळख आहे. पदवीधर निवडणुकीत दोन ‘टर्म’ पूर्ण केल्यानंतर तिसऱ्यावेळी चव्हाण यांचे पारडे अधिकच जड होते. त्यांनाच तिकीट मिळणार हे आधीच ठरलेले होते. पक्षांतर्गत तुल्यबळ दावेदार त्यांच्या जवळपासही कुणी नव्हता. त्यामुळे बंडाचे कारणही नव्हते. त्यामुळे एक तपापासून चव्हाणांच्या ताब्यात असलेल्या गडाला भाजपकडून साधे ओरखाडेही बसले नाहीत.

शिवसेनेची साथ
राज्यात महाविकास आघाडी असल्याने त्यांना शिवसेनेची मोठी साथ मिळाली. पदवीधरसाठी युवासेनेचे इच्छुक अक्षय खेडकर हे ‘ॲक्टिव्ह’ पदाधिकारी आहेत. त्यांनी हजारोंच्या घरात नोंदणी केली होती; पण पक्षादेशानंतर त्यांना तलवार म्यान करावी लागली; पर्यायाने शिवसेनेचे सर्व बळ सतीश चव्हाण यांच्या पाठीशी होते. अगदी मतदानाच्या दिवशीही शिवसेना नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मतदान बूथवर ठाण मांडून बसलेले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही आवाहन असल्याने सर्वजण चव्हाण यांच्यासाठी झपाटून कामाला लागले.


विजयाची काही कारणे
- चव्हाणच उमेदवारीचे मोठे दावेदार होते. तयारीला मोठा वेळ मिळाला.
- महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपचा उमेदवारही निश्‍चित नव्हता.
- सप्टेंबर २०१९ पासून चव्हाण यांनी पदवीधर नोंदणी सुरू केली होती.
- प्रत्येक तालुका पालथा घातला. शाळा, महाविद्यालयांसह मतदारांशी भेटी.
- सुमारे दीड ते दोन लाख पदवीधरांची नोंदणी त्यांनी केली होती.
- विविध शिक्षक, संस्था व संस्थाचालकांसह मशिप्र मंडळ जमेची बाजू.
- लातूर, उस्मानाबाद गड, जयसिंगरावांसारख्या अनुभवींची साथ.
- मतदान करून घेण्याकडे जास्त कल; मतदारांची काळजीही घेतली.

चव्हाणांचेच ‘बळ’
-----------------
एकूण झालेले मतदान ः २ लाख ४१ हजार ९०८
बाद झालेली मते ः २३ हजार ९२
सतीश चव्हाण यांना मिळालेली मते ः १ लाख १६ हजार ६३८
शिरीष बोराळकरांना मिळालेली मते ः ५८ हजार ७४३
३३ उमेदवारांना मिळालेली एकूण मते ः ४३ हजार ४३५

मतदानात...
- सतीश चव्हाणांचा पूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान दबदबा.
- सतीश चव्हाण यांना ४८.२१ टक्के मते पडली.
- बोराळकरांना २४.२९ टक्के मते पडली अर्थात चव्हाणांच्या निम्मे.
- उर्वरित ३३ उमेदवारांना १७.९६ टक्के मते पडली. बाद मते ९.५४ टक्के.
- सर्व उमेदवारांची मते ४२.२५ टक्के तर एकट्या चव्हाणांची मते ४८.२१ टक्के.  

Edited - Ganesh Pitekar