चौतीस ठिकाणी घटला भूजलस्तर

चौतीस ठिकाणी घटला भूजलस्तर

औरंगाबाद - पावसाची अनिश्चितता असल्यामुळे जमिनीच्या पोटातून पाण्याचा उपसा करून विहिरींच्या माध्यमातून शाश्‍वत सिंचनाची सोय केली जात आहे, मात्र उपशाच्या प्रमाणात फेरभरण होत नसल्याने पावसाळ्यानंतर भूजलपातळीत अपेक्षित वाढ होत नाही. परिणामी भूजलपातळी खालावली आहे. 

भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या जिल्ह्यातील १४१ निरीक्षण विहिरींपैकी ३४ विहिरींमधील भूजलपातळी सरासरीच्या तुलनेत घटली आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तब्बल २११ गावे, वाड्या, वस्त्यांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रानुसार डोंगराळ, पठारी आणि नदीजवळच्या सपाट प्रदेश अशा तीन भागांमध्ये जिल्ह्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
 सिल्लोड, सोयगाव, कन्नड या तीन तालुक्यांमध्ये डोंगराळ भाग असल्याने भूजलाची उपलब्धता कमी असते. या भागामध्ये ११ पाणलोट क्षेत्रे आहेत. फुलंब्री, औरंगाबाद , वैजापूर आणि गंगापूर या तालुक्यांतील पठारी भागामध्ये ३२ पाणलोट क्षेत्रांचा समावेश आहे. हा भाग पठारी असल्यामुळे भूजलाची कुठे मध्यम तर कुठे चांगली स्थिती आहे 

 नदी खोऱ्यातील सपाट मैदानी विभागात नऊ पाणलोट क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये पैठण , गंगापूर आणि वैजापूर तालुक्‍यांचा समावेश आहे. या भागात जमिनीत पाणी मुरण्याचे आणि ते पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याचे निदर्शनास आले असल्याचे भूजल सर्वेक्षण यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले.

संभाव्य टंचाई

पाणलोट क्षेत्रनिहाय निरीक्षण विहिरींच्या अभ्यासाआधारे जानेवारीपासून जूनपर्यंत तब्बल २११ गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता आहे. त्यात औरंगाबाद तालुक्यातील ६१, पैठण ६४, गंगापूर तालुक्यातील ५४, खुलताबाद तालुक्यातील २४ तर कन्नड तालुक्यातील आठ गावांचा समावेश असून, या ठिकाणचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.

अशी ठरते संभाव्य टंचाई

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रकाश शेलार यांनी सांगितले, की भूजलाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे जिल्ह्यातील ५२ पाणलोट क्षेत्रात १४१ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या आहेत.

या विहिरीतील भूजलपातळीचा ऑक्टोबर, जानेवारी, मार्च आणि मे अशी चार महिन्यांत पाणीपातळीविषयक अभ्यास केला जातो. त्याआधारे पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाईची शक्यता आहे. मात्र जिल्ह्याची भौगोलिक भूशास्त्रीय रचना आणि दिवसेंदिवस वाढता भूजल उपसा यामुळे जिल्ह्यातील गावपातळीवरील भूजलपातळीचे विचलन कळण्यासाठी जलस्वराज-२ प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातल्या १,२६७ गावांमध्ये निरीक्षण करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत निरीक्षण विहिरींमधील भूजलपातळीचा अभ्यास करण्यात आला आहे. जिल्ह्याची सरासरी वार्षिक पाणीपातळी १.८ मीटरने वाढली आहे.

  •  जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्र : ५२
  •  डोंगराळ भागातील पाणलोट क्षेत्र : ११
  •  पठारी भागातील पाणलोट क्षेत्र : ३२
  •  नदीजवळील सपाट भागातील पाणलोट क्षेत्र : ९
  •  भूजलच्या जिल्ह्यातील निरीक्षण विहिरी : १४१

कमी पाऊस झाल्यानंतर धरणात पाण्याची उपलब्धता कमी होते, याचा परिणाम लाभक्षेत्रातील थेट शेतातील उभ्या पिकांवर होतो. मग या पिकांसाठी भूजलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, यामुळे भूजलात घट होत जाते. यासाठी प्रत्येक गावांमध्ये पाण्याचा ताळेबंद मांडूनच त्याच्या उपलब्धतेनुसार पीकपद्धतीची रचना करणे अपेक्षित आहे.

प्रकाश शेलार, वरिष्ठ भूवैज्ञानिक

ग्रामीण भागात हातपंपाद्वारे जमिनीच्या पोटातून पाणी घेतो. यामुळे जमिनीची जलफेरभरण करून परतफेड करणे गरजेचे आहे. यासाठी हातपंप व स्टँडपोस्टचे वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी ३८ ठिकाणी शोषखड्डे तयार करून जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून जिरवले जात आहे. अशाच प्रकारे जिल्ह्यात अन्यत्रही वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरवले जाणार आहे.

बाळासाहेब पाटील उपअभियंता, यांत्रिकी विभाग, पाणीपुरवठा

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com