युवकाने स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र : का बरं ते वाचा 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 8 जानेवारी 2020

आमचा रस्ता करण्यास विरोध नाही; परंतु महापालिकेने आमच्याकडून रीतसर भूसंपादन करावे किंवा पर्यायी जागेवर घरे बांधून देत आमचे पुनर्वसन करावे.

औरंगाबाद - "गरिबांना न्याय कधी मिळणार? राजकारणी आम्हाला असेच किड्या मुंग्यांसारखे चिरडणार का, याचे उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावे,' अशी विनंती करणारे पत्र जयभवानीनगर येथील एका युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या रक्ताने लिहिले आहे. महापालिकेच्या रस्ता रुंदीकरणात सुमारे 250 घरे जाणार असल्यामुळे आमचे पुनर्वसन करावे किंवा पैसे देऊन भूसंपादन केले जावे यासाठी हे पत्र लिहिण्यात आले आहे. 

जयभवानीनगर परिसरातील गणेश सूर्यवंशी याने रक्‍ताने लिहिलेल्या पत्रासोबत एक निवेदन मुख्यमंत्री कार्यालयात पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे. शिवाजीनगर ते रामनगर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यादरम्यान, विश्रांतीनगर ते जयभवानीनगर भागातील सुमारे अडीचशे घर बाधित होत आहेत. 

गुंता कायम -  जिल्हा परिषद हातात आली, मात्र आता विरोधात कोण?

गेल्या 15 ते 20 वर्षांपासून लोक तिथे राहत असून बॉन्डवर खरेदी केलेल्या प्लॉटवर ही घरे बांधण्यात आली आहेत. यातील अनेकजण महापालिकेला कर देखील भरतात. शिवाय गुंठेवारीत समावेश करावा, अशी मागणी देखील येथील रहिवाशांनी महापालिकेकडे केलेली आहे. मात्र, कोणतीही सूचना न देता महापालिकेने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. 

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

आमचा रस्ता करण्यास विरोध नाही; परंतु महापालिकेने आमच्याकडून रीतसर भूसंपादन करावे किंवा पर्यायी जागेवर घरे बांधून देत आमचे पुनर्वसन करावे. जोपर्यंत यापैकी कुठलाही निर्णय होत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम करू नये, अशी मागणी देखील श्री. सूर्यवंशी या तरुणाने महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad he wrote letter through his blood to Chief Minister