आईने जाळून घेतले तेव्हा, चिमुकलीने सोडवली बापाची दारू.. पहा Video

संदीप लांडगे
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

एकदा बाबा दारू पिऊन माझ्या शाळेत आले. शाळेच्या कोपऱ्यावरच दारू पिऊन पडले. मुलं त्यांना हसू लागले. मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे बघून मुलं हसू लागले, त्यामुळे मला खूप वाईट वाटले, रडू आले

औरंगाबाद - दारूमुळे अनेक संसार उद्‌ध्वस्त झाल्याची कित्येक उदाहरणे आहेत. दारू पिणाऱ्या व्यक्तीला कितीही समजावून सांगितले तरी तो दारू पीतच राहतो. मात्र, गारखेडा परिसरातील छत्रपती विद्यालयात इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या रोशनी संजय डिघोळे या अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांची दारू सोडण्यासाठी केलेले प्रयत्न शाळेसह परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. 

या कोवळ्या वयातील मुलीने आपले मनोगत "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. रोशनी म्हणाली, की माझे वडील संजय डिघोळे हे रंगकाम करतात. आमचे मूळगाव निंभोरा (ता. कन्नड) एक छोटेसे खेडे आहे. कामधंदा नसल्यामुळे त्यांना माझ्या जन्माआधीच दारूचे व्यसन लागले. त्यामुळे घरात भांडण, खाण्यापिण्याची चणचण भासू लागली. त्यामुळे आजी-बाबांनी गाव सोडण्यास सांगितले. 

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी

चार वर्षांपूर्वी आई, वडील आणि मी कामाच्या शोधात औरंगाबादेत आलो. रंगकाम करण्याचे काम मिळत असल्याने हातात पैसा येऊ लागल्याने दारू पिणं वाढलं. वडिलांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे भांडणे वाढली. या भांडणामुळे आईने जाळून घेतले. त्यात आई मोठ्या प्रमाणावर जळाली. उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च आला. गावाकडचा शेतीचा असलेला छोटा तुकडा विकून आईवर उपचार करण्यात आले. मला हे सर्व कळू शकेल, असे माझे वय नव्हते; पण आई ती कहाणी सांगते तीचे जळालेलं शरीर दिसतं तेव्हा मी अस्वस्थ होते. 

एकदा बाबा दारू पिऊन माझ्या शाळेत आले. शाळेच्या कोपऱ्यावरच दारू पिऊन पडले. मुलं त्यांना हसू लागले. मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला तर मलाही मुलं हसू लागले, त्यामुळे मला खूप वाईट वाटले, रडू आले. तेव्हाच ठरवले काहीही झालं तरी वडिलांची दारू सोडायची. याबाबत आमच्या शाळेतील शिक्षक रामदास वाघमारे यांना सांगितले. त्यांनी एक उपाय सांगितला, शाळेतून दररोज घरी गेल्यावर वडिलांना दारूचे तोटे, कुटुंबाचे होणारे नुकसान याबाबत न चुकता माहिती द्यायची, हे दररोज करायचं. 
वडिलांची दारू सोडण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. 

वाचा कसा -  दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत हलगर्जीपणा  

शाळेतून दररोज घरी गेल्यावर बाबांच्या पाया पडायचे अन्‌ दारू किती वाईट, शरीराला हानिकारक आहे ते समजावून सांगत असे. परंतु, सुरवातीला त्यांच्यावर माझ्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नव्हता. मी धीर सोडला नाही. दररोज त्यांना समजावण्याचा नित्यनियम सुरू ठेवला. माझ्या मैत्रिणीही घरी आल्या, की त्यांना दारूविषयी समजावून सांगत. मोठ्या माणसांना आम्ही लहान मुली कडक शब्दांत कसे सांगणार? हळूहळू परिणाम दिसू लागला.  त्यांनी दारू पिणं बंद केलं. हे सांगताना रोशनीच्या डोळ्यांत आनंदाश्रू अन्‌ वडिलांबाबत असलेला जिव्हाळा जाणवत होता. हे सांगताना तीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. 

पहा -  "परीक्षेला सामोरे जाताना...video  

आता ते घरी पेन, वही आणतात 
दारू पिण्याऐवजी ते रोज खाऊ, पेन, वही, ड्रेस घेऊन येऊ लागले. आता शाळेत येताना एका सुशिक्षित पालकांसारखे येतात. शिक्षकांनी त्यांचा शाळेत सन्मान केला. गेल्या एक वर्षापासून त्यांनी दारूला स्पर्शही केला नाही. त्यामुळे घराची परिस्थिती सुधारली आहे, असे रोशनीने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad - A heartwarming story of a little girl