‘पेट’संदर्भातील याचिका खंडपीठाने फेटाळली, घरूनच ऑनलाइन परीक्षा देण्याची केली होती विनंती

सुषेन जाधव
Thursday, 18 February 2021

तथापि, या पेपरला विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या काही तक्रारी विद्यापीठास प्राप्त झाल्या होत्या.

औरंगाबाद : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या ‘पेट’ परीक्षेचा दुसरा पेपर विद्यार्थ्यांना घरून देण्यास मान्यता द्यावी, अशी विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या पीठाने फेटाळली.

विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे. ‘पेट'चा पहिला पेपर ३० जानेवारी रोजी घेण्यात आला. हा पेपर ऑनलाइन पद्धतीने घरी राहून घेण्यात आला. तथापि, या पेपरला विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या काही तक्रारी विद्यापीठास प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्र्वभूमीवर पेटचा दुसरा पेपर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीनेच घरून परीक्षा देण्याऐवजी परीक्षा केंद्रावरून घेण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे.

या निर्णयास मोहम्मद यासीन व अतुल कांबळे यांनी खंडपीठात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. तथापि, शासन निर्णयाप्रमाणे ‘कोविंडसंदर्भात सर्वतोपरी उपायोजना करून सदर परीक्षा घेण्यात येईल, असे विद्यापीठाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर खंडपीठाने या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका निकाली काढली. विद्यापीठातर्फे ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले. विधी अधिकारी किशोर नाडे यांनी त्यांना सहकार्य केले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तबरेजुद्दीन कादरी यांनी काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad High Court Bench Rejected Petition Of PET