हे लाेक शाेधणार सव्वा लाख बेकायदा नळ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

येत्या आठ दिवसांत सुमारे 250 लाइनमनने बेकायदा नळांचा सर्वे करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले. 

औरंगाबाद- उन्हाळा तोंडावर असला तरी जानेवारीतच शहराला पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. अनेक भागात तब्बल सातव्या दिवशी पाणी मिळत असल्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी (ता.28) आढावा बैठक घेतली. त्यात बेकायदा नळांच्या आकडेवारीवरून लाइनमनला धारेवर धरत त्यांनी येत्या आठ दिवसांत सुमारे सव्वालाख बेकायदा नळांचा शोध घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नाथसागराने गतवर्षी तळ गाठला होता. त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीच्या काळात तर मोठ-मोठी आंदोलनेही झाली. त्याचा फटका शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना देखील बसला. आता महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वी पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला तर शिवसेनेला फटका बसू शकतो. म्हणून महापौरांनी मंगळवारी आपल्या दालनात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. समान पाणी वाटपावर महापौरांनी बोट ठेवले. शहागंज व मरिमाता येथील पाण्याच्या टाकीवरून तब्बल सातव्या दिवशी पाणीपुरवठा होतो, तर इतर भागात सहाव्या दिवशी पाणी मिळते.

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

काही भागात पाऊणतास तर काही भागात तासन्‌तास पाणी दिले जात आहे. शहराची पाण्याची गरज 200 एमएलडी असेल आणि रोज 124 एमएलडी पाणी मिळत असेल तर गॅप कमी झाला पाहिजे, असे मत महापौरांनी व्यक्त केले; मात्र त्यावर अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. बेकायदा नळांचा विषय निघाल्यानंतर महापौर संतप्त झाले. लाइनमनला प्रत्येक भागातील खडान्‌ खडा माहिती असते. त्यांच्या संमतीशिवाय बेकायदा नळ कनेक्‍शन होऊच शकत नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसांत सुमारे 250 लाइनमनने बेकायदा नळांचा सर्वे करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले. 

किमान एक तास पाणी द्या 
पाण्याचे वेळापत्रक समान करून प्रत्येक भागाला किमान एक तास पाणी देण्यात यावे, असे आदेश महापौरांनी यावेळी दिले. त्यावर अधिकाऱ्यांनी नियोजन करण्याचे आश्‍वासन दिले. आयुक्तांनी पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी बैठक घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आल्याचे महापौरांनी नमूद केले. 

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS
 
...अन्यथा होऊ शकते पाणी बंद 
पाणी शुद्धीकरणासाठी महापालिकेतर्फे त्रुटीसह आवश्‍यक औषधी खरेदी केली जाते. तसेच यंत्रसामग्री जीर्ण झाल्यामुळे वारंवार दुरुस्ती करावी लागते. देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटदाराचे तीन कोटी तर औषधींचे 60 लाख रुपये थकीत आहेत. ही बिले दिली गेली नाहीत तर कंत्राटदार कामावर बहिष्कार टाकू शकतो. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. 
 
बैठकीतील ठळक मुद्दे 

  • सध्या 78 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्यात 120 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होते. त्यामुळे 120 टॅंकर तयार ठेवण्याचे आदेश. 
  • 1500 हातपंप असून, त्यातील 100 हातपंप नादुरुस्त आहेत. ते दुरुस्त करण्यात यावेत. 
  • अनेक वॉर्डात विहिरीवरून पाइपलाइन करून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. अशी व्यवस्था अन्य वॉर्डांतही होऊ शकते का? याची चाचपणी करणार. 
  • गतवर्षीप्रमाणे विहिरींच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव तयार करावा. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad illegal Tap connection