video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! 

औरंगाबाद : नंदकिशोर कयाल यांच्या संग्रहातील काही दुर्मिळ नाणी
औरंगाबाद : नंदकिशोर कयाल यांच्या संग्रहातील काही दुर्मिळ नाणी

औरंगाबाद - शिलालेख, ताम्रपत्र, भोजपत्र, लेणी आणि नाण्यांवरून संबंधित शासनकर्त्यांच्या कालखंडातील इतिहास जाणून घेता येतो. प्राचीन नाण्यांच्या संग्रहातून इतिहासाचा धांडोळा घेण्याचे काम करीत आहेत नंदकिशोर कयाल.

इयत्ता चौथीमध्ये शिकत असतानापासूनचा छंद त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षापर्यंत आजही जोपासत हजार - दोन हजार नव्हे, तर चक्‍क 25 हजार दुर्मिळ नाण्यांचा संग्रह केला आहे. सातवाहन, छत्रपती शिवाजी महाराज, चंगेजखान, तैमूरलंग, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब, शाहआलम, अल्लाउद्दीन खिलजी, मोहंमद तुघलक, पेशवाईपासून ते सध्या प्रचलित असलेल्या नाण्यांचा त्यांच्या संग्रहात समावेश आहे. 

मूळचे हिंगोली जिल्ह्यातील नंदकिशोर कयाल यांचा जन्म 15 ऑगस्ट 1947 चा. घरी वडिलोपार्जित सोने-चांदीचे दुकान होते. त्यावेळपासून नाण्यांचे आकर्षण वाटायला लागले.

चौथीत असतानापासून नाणी जमा करायला सुरवात केली. नंतर जिथे कुणाकडे जुनी दुर्मिळ नाणी आहेत, असे समजल्यानंतर त्यांच्याकडे जाऊन ती विकत घेत. काश्‍मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचा कोणताही प्रदेश नसेल; जिथे ही नाणी घेण्यासाठी जायचे राहिले. प्रत्येक राज्यात जाऊन आले. 

इतिहासकार रानडे, गुप्तेंची मदत 

1964 मध्ये आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी घेतली. वडील 100 रुपये पाठवत. तेव्हा मोहन टॉकीजवर तिकीट बुकिंगचे कामही केले. माजी कुलगुरू डॉ. आर. पी. नाथ यांचा मी कॉलेजमध्ये आवडता शिष्य होतो. त्यांच्या ओळखीने प्रसिद्ध इतिहासकार पंढरीनाथ रानडे, रमेश गुप्ते यांच्याशी परिचय झाला आणि त्यांची मला खूप मोठी मदत झाली आहे.

मी संग्रहित करीत असलेली नाणी बहुतांश अरबी किंवा उर्दू भाषेतील होती. ती नाण्यावरची लिपी वाचून त्याचा मराठी भाषेत अनुवाद करून देण्यात या दोघांचे खूप मोठे योगदान आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी या नाण्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे, असे त्यांनी सांगितले. 

या राजांच्या कालखंडातील नाणी 

पाच हजार वर्षांपूर्वीची दुर्मिळ प्राचीन भारतातील नाणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, सातवाहन राजे, हसन गंगू बहामनी, दिल्लीचा सुलतान फिरोजशाह, अल्लाउद्दीन खिलजी, मोहंमद बिन तुघलक, चंगेजखान, गोवळकोंड्याचा कुतुबशाह, तैमूरलंग, मोगल बादशाह हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब, शाह आलम, टिपू सुलतान, कुतुबुद्दीन ऐबक, होळकर, नागपुरकर भोसले, पेशवे, हैदराबादचा निजाम, इब्राहिम आदिलशाह यांच्यासह अनेक राजांच्या कालखंडातील तांब्याची नाणी श्री. कयाल यांच्या संग्रहात आहेत.

हिंदू राजांच्या नाण्यांवर झाड, सिंह, धनुष्य, त्रिशूळ, झाडाचे पान, फूल अशी चिन्हे असून, त्या - त्या राजांची नावे आहेत. याशिवाय इराक, अफगाणिस्तान, सौदी अरब, युनायटेड अरब अमिरात, कुवैत, मलेशिया, सिंगापूर, पोर्तुगाल, फिलिपाईन्स, हॉंगकॉंग, नेपाळ, इंडोनेशिया, भुतान, कॅनडा, पाकिस्तान, अमेरिका आदी 25 देशांचीही नाणी त्यांच्या संग्रही आहेत. 

बहिणीच्या नावाने उभारणार म्युझियम 

दुर्मिळ नाणी संग्राहक नंदकिशोर कयाल औरंगाबादच्या श्रेयनगरमधील प्राईड रेसिडेन्सीमध्ये राहतात. ते म्हणाले, की मी हिंगोलीत असताना बहीण उमा हिने मला औरंगाबादमध्ये आणले.

आज मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही. त्या बहिणीच्या नावाने प्राईड रेसिडेन्सीमध्येच येत्या सहा महिन्यांत "उमा म्युझियम' उभारणार आहे. अजूनही कुणाकडे दुर्मिळ नाणी असतील तर ती विकत घ्यायला तयार आहे. त्यांनी 9823870238 क्रमांकावर संपर्क करावा.

नाणी जमा करण्याच्या छंदापायी मी 20 वर्षे घराबाहेर असायचो. त्या काळात पत्नी सूरजबाई यांनीही कितीही अडचणी आल्या तरी माझ्या छंदापुढे अडचणी येऊ दिल्या नाहीत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com